छोटी रोजेदार आयशा बंदरकरचे होत आहे कौतुक
पोलिस प्रवाह न्युज
माणगाव - दि. २- इस्लामी शाबान महिन्यानंतर रमजान महिना सुरु होतो. शनिवार दि. १ मार्च रोजी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यावर पवित्र रमजान महिना सुरु होऊन मुस्लिम बांधवांचे रविवार दि. २ मार्चपासून पवित्र रमजानचे रोजे सुरु झाले. सकाळी सहा नंतर रोजा धरणे म्हणजे दिवसभर थुंकी देखील न गिळता विना अन्न पाण्यावाचून राहणे फार कठीण असते. अशाचप्रकारे माणगांव तालुक्यातील मोर्बा येथील आयशा इरशाद बंदरकर हिने वयाच्या ८ व्या वर्षी पवित्र रमजान महिन्यात ३० रोजे पूर्ण केले आहेत. या आयशाचा वडीलांचा इरशाद बंदरकर यांचा हॉटेल आणि आणि कॅटरर्सचा व्यवसाय आहे. छोटी रोजेदार म्हणून आयशा हिने ३० रोजे पूर्ण केल्याने आयशा बंदरकर हिचे मोर्बा गावच नव्हे तर माणगांव तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून कौतुक होत आहे.
इस्लाम धर्मात नमाज, रोजा, जकात, हाज, इमान हि पाच मूलभूत तत्वे मानली जातात. त्यापैकी रोजा हा एक असून पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधव अल्ल्हाच्या नावावर पवित्र रमजानचे रोजे महिनाभर धरीत असतात. पहाटे ३ वाजता उठून मुस्लिम भगिनी स्वयंपाक करतात. त्यानंतर पहाटेच्या बांगी अगोदर सहेरी करणे म्हणजेच थोडे फार खाऊन रोजा मुस्लिम बांधव अल्ल्हाच्या नावाने धरतात. हा रोजा सायंकाळी मगरीब नमाजच्या बांगी बरोबर सोडला जातो त्यास इफ्तारी असे म्हणतात. या पवित्र रमजान महिन्यात रोजे करण्याबरोबरच नमाज, कुराण पठण करणे, तराविहची नमाज व दान धर्मावर मुस्लिम बांधवांचा जास्त भर असतो. आयशा बंदरकर हिच्या वडिलांचा मोर्बा गावात धार्मिक आणि सामाजिक कार्यात हिर-हिरीने सहभाग असतो. घरातील धार्मिक वातावरण यामुळे रमजान मधील रोजे पूर्ण करण्याची इच्छाशक्ती प्रबळ झाल्याचे आयशा बंदरकर हिने सांगितले आहे.



0 टिप्पण्या