कळमजे गावात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.

 कळमजे गावात अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.


पोलीस प्रवाह न्युज

माणगाव - दि. २८- वै. ह. भ. प. बाबू भिवा गुगले महाराज यांच्या आशीर्वादाने व ह. भ. प. जयराम गंगाराम खाडे यांच्या मार्गद्शनाखाली माणगांव तालुक्यातील कळमजे या गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी चे पारायणचे आयोजन करण्यात आले होते. अखंड हरीनाम सप्ताहाच्या पवित्र अनुभूतीत गावाने भाविकतेचे डोह पूर्ण केले. सलग तीन दिवस हरिनामाच्या अखंड प्रवाहाने गावातील वातावरणात आध्यात्मिक चैतन्य जागवले. 


या अखंड हरिनाम सप्ताहाचे व्यवस्थापन व नियोजन ग्रामस्थ मंडळ कळमजे, महिला मंडळ व मुंबईकर मंडळ कळमजे, शिवगर्जना मित्र मंडळ कळमजे, पंच कमिटी सदस्य मुकुंद वाढवळ, सुभाष वाढवळ, जयराम खाडे, अनंत वाढवळ, मोहन वाढवळ, राम पडवळ, सिताराम राऊत, सत्यवान वाढवळ, सुधीर वाढवळ, प्रकाश राऊत आदी व सर्व ग्रामस्थ यांनी केले. 


 या हरीनाम सप्ताहाचा प्रारंभ शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी पहाटे काकड आरतीने झाला. तसेच दैनंदिन कार्यक्रम सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते ४ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेवरील भजन , सायंकाळी ४.३० ते ५.३० प्रवचन , ६ ते ८ हरिपाठ , ९ ते ११ कीर्तन , रात्री १२ ते ३ हरीजागर , ४.३० ते ५.३० काकडा व मंगळवार दिनांक २५ रोजी ह. भ. प. ऋतुजाताई राधेशाम पाटील यांचे कीर्तन झाले. दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ काल्याचे कीर्तन ह. भ. प. बाटे महाराज यांचे कीर्तन झाले. 


यावेळी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच दररोजचे भजन, कीर्तन, व हरीनाम जपात जणू गावाने रामनामाचा जयजयकार केला. परिसरातील प्रख्यात कीर्तनकारांनी आपल्या अध्यात्मिक शब्दांतून भगवान विठ्ठल व रुखमाई यांच्या लीला उजळल्या. तसेच शिवचरित्र आणि कीर्तनाच्या मधुर लयीत श्रोते हरवून गेले.तसेच या हरिनाम सप्ताहास विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भेट देऊन हरीभजन आणि संप्रदाययिक कार्यक्रमाचा लाभ घेतला व मनोभावे दर्शन व पूजन अर्चन केले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या