हेदमलई गावाने सलग दुसऱ्यांदा जिंकला स्वदेस फाउंडेशन तर्फे स्वप्नातील गाव पुरस्कार

 हेदमलई गावाने सलग दुसऱ्यांदा जिंकला स्वदेस फाउंडेशन तर्फे स्वप्नातील गाव पुरस्कार


पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. १७-  तालुक्यात मधील हेदमलई गावाने पुन्हा एकदा स्वदेस फाउंडेशन तर्फे स्वप्नातील गाव पुरस्कार जिंकला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या खंबीर गावकऱ्यांनी ८०% पेक्षा जास्त उद्दिष्टे पूर्ण करून आणि स्वप्नातील गावाच्या सर्व ६३ निकषांची पूर्तता करून हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवला आहे. वृद्ध लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असतानाही ग्रामस्थांच्या एकतेने आणि आत्मविश्वासाने तसेच स्वदेस प्रतिनिधी कोमल माने यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाने त्यांना या उल्लेखनीय यश प्राप्त करता आले. 

या कार्यक्रमासाठी पळसप ग्रामपंचायतीचे सरपंच  रोशन पांचाल, कृषी सहाय्यक राघोबा धुरी आणि हेदमलई प्राथमिक शाळेचे शिक्षक बालाजी गोंड, स्वदेसचे ३६० माणगाव तालुका व्यवस्थापक शितल सूर्यवंशी तसेच प्रतिनिधी सिद्धेश शिर्के व गाव विकास समिती प्रतिनिधी यांचीही उपस्थिती होती. 

कार्यक्रम प्रसंगी गाव विकास समितीने स्वदेस फाउंडेशन आणि सरकारी उपक्रमांच्या संयुक्त प्रयत्नांचा अभिमानाने उल्लेख केला. विशेषत: मुंबईकर ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. माणगाव व्यवस्थापक शितल सूर्यवंशी यांनी आर्थिक विकासाचे महत्त्व अधोरेखित केले व गावकऱ्यांना या यशप्राप्तीसाठी प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच सरपंच रोशन पांचाल यांनी गावातील अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता यांसारख्या कामांचा शासना बरोबर पाठपुरावा करून लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. कृषी अधिकारी राघोबा धुरी यांनी गावकऱ्यांचे उत्पन्न वाढी माहिती दिली व गावाच्या विकासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्राथमिक शिक्षक बालाजी गोंड यांनी गावातील लोक शिक्षणासाठी कसे जागरूक आहेत त्याबद्दल माहिती दिली. सिद्धेश शिर्के यांनी मार्गदर्शन करताना गावकऱ्यांच्या कौतुक केले व त्यांच्या बरोबर काम करताना आलेले अनुभव सांगितले.   

स्वदेस प्रतिनिधी कोमल माने यांनी हेदमलई गाव इतर गावांपेक्षा कसे वेगळे आहे आणि हेच खऱ्या अर्थाने स्वप्नातील गाव कसे घडले हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, गावामधे जास्तीत जास्त वृद्ध लोकसंख्या असतानाही स्वदेश मित्र म्हणून काम करणाऱ्या जानव्ही पिंपळे यांनी स्वाक्षरीचे महत्त्व समजावून सांगितले व गावातील प्रत्येक महिलेला एकत्र करून रात्रीच्या वेळी महिलांची शाळा भरवून त्यांना स्वाक्षरी कशी करावी हे शिकवले. तसेच गावप्रमुख बाबूराव शिगवण आणि राम शिंदे यांसारखे गावकरी ग्रामस्थांची अर्थव्यवस्था कशी वाढवायची आणि मुंबई पुण्यासारख्या शहरात होणारे स्थलांतरन कसे थांबवायचे याचा विचार करून गावकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तसेच ग्राम विकासाच्या कामांना त्यांनी सुरुवात देखील केली आहे. महिलांच्या सक्षमीकरणाबाबत स्वदेसच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणारे उपक्रम  खरोखर उल्लेखनीय आहेत.

स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि झरीना स्क्रूवाला तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे आणि संचालक प्रदीप साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हेदमलई गावा बरोबरच रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये विकासाची वेगवेगळी कामे गाव विकास समितीच्या सहकार्यातून सुरू आहेत. हेदमलईचे यश म्हणजे एकतेने, स्थैर्याने आणि संयुक्त प्रयत्नांनी काय साध्य केले जाऊ शकते याचे एक तेजस्वी उदाहरण आहे. हे गाव इतरांना प्रेरणा देत आहे. सततच्या समर्पणाने अपूर्व यश कसे मिळवता येते हे हेदमलई गावाने प्रत्येक घराला रंग, शौचालयाचा वापर, प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन, आर्थिक उत्पन्ना मधे वाढ, महिला सशक्तीकरण व शासकीय योजनांचा कृती संगम ही कामे करून सिद्ध करून दाखवले आहे. 

कार्यक्रमाचा समारोप "स्व-से-बने-देस!" या घोषणेने झाला. हेदमलई गावाची कहाणी गाव विकास समितीच्या प्रयत्नातून करण्यात आलेल्या ग्रामीण समुदायांमधील अविश्वसनीय क्षमतेचा पुरावा आहे. हेदमलई गाव हे माणगाव तालुक्यामधील इतर गावांना आपला व गावाचा विकास घडवून आणण्यासाठी प्रेरणा देत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या