मी जन्माने जरी गवळी असलो तरी कर्माने कुणबी - खासदार सुनिल तटकरे

 मी जन्माने जरी गवळी असलो तरी कर्माने कुणबी - खासदार सुनिल तटकरे 

खासदार सुनिल तटकरे यांनी कुणबी समाजाप्रती व्यक्त केले ऋणानुबंध

पोलीस प्रवाह न्यूज

म्हसळा-दि. ४- माझ्या राजकीय आयुष्यात मी कधीही निवडणूक जवळ आली की मते मागण्यासाठी राजकारण करीत नाही तर माझी बांधिलकी ही सतत सामाजिक कामांसाठी असते. त्याचबरोबर मी जाती धर्माचे नावावर गल्लत करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही. जनतेची अविरतपणे सेवा करून कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही जाती धर्मातील लोकं अडीअडचणी घेऊन आले तरी प्राधान्याने सोडवत असतो. म्हणूनच आमची आणि जनतेची नाळ जोडली गेली आहे. काही नेते समाजाचे नावावर मते मागत फिरत असतात पण समाजाचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करून राजकारण करीत आहेत अशा शब्दात शिवसेना नेते माजी खासदार अनंत गीते यांच्यावर निशाणा साधला. कुणबी समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले असून वाडीवस्त्यांवर विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर मुंबईत भांडुप सारख्या शहरात कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या भव्यदिव्य इमारती साठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून देण्याचे भाग्य लाभले असल्याने मी जन्माने जरी गवळी असलो तरी कर्माने कुणबी आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांनी २५ लक्ष मंजुरी खर्चाचे म्हसळा तालुका कुणबी समाज इमारत सुशोभीकरण भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले आहे.


खासदार सुनिल तटकरे यांनी पुढे बोलताना सांगितले की, माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी राज्यासह रायगड जिल्ह्याचे जडणघडणी मध्ये दिलेले योगदान कधीही न विसरण्यासारखे आहे. त्यांनीही कुणबी समाजासाठी भरीव योगदान दिलेले आहे. मतदारसंघात फक्त सामाजिक सभागृहांच्या इमारती बांधून थांबायचे नाही तर या इमारतीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यावर आम्ही प्रयत्नशील आहोत. मुंबई येथील कुणबी समाजाचे इमारती साठी निधी घेऊ नये म्हणून काही नेत्यांनी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमची बांधिलकी समाजबांधवांबरोबर असल्याने यातुन मार्ग काढून आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्वाखाली सरकार मधे सामील झाल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत दीड महिन्यांपूर्वी या इमारतीचे लोकार्पण सोहळा सुद्धा संपन्न झाला. कुणबी समाजाने राजकीय जीवनात आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे त्यामुळे आगामी काळात कुणबी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तटकरे कुटुंबीय कटिबद्ध आहोत असे अभिवचन खासदार सुनिल तटकरे यांनी कुणबी बांधवांना दिले.

आयोजित कार्यक्रमात कुणबी समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील, लक्ष्मण भाये, अंकुश खडस यांनी समाजासाठी तटकरे कुटुंबाकडून जे योगदान दिलेले आहे। त्यासाठी खासदार सुनिल तटकरे यांचे आभार मानून म्हसळा तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधव आगामी काळात शंभर टक्के खासदार तटकरे यांचे सोबत असतील असे आश्वासन दिले.


यावेळी खासदार सुनिल तटकरे यांचे सोबत म्हसळा तालुका कुणबी समाज अध्यक्ष महादेव पाटील, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेवराव पाटील, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे, माजी जिप सभापती बबन मनवे, मुंबई कमिटी अध्यक्ष महेश शिर्के, जेष्ठ नेते लक्ष्मण भाये, अंकुश खडस, संतोष सावंत, सतिश शिगवण, महेश घोले, माजी उपसभापती संदिप चाचले, किरण पालांडे, दिलीप मांडवकर, रामचंद्र बोर्ले, सरचिटणीस गणेश बोर्ले, माजी सभापती उज्वला सावंत, माजी सभापती छाया म्हात्रे, श्रीवर्धन मतदारसंघ महिला अध्यक्षा सोनल घोले, म्हसळा तालुका महिला अध्यक्षा मीनाताई टिंगरे यांसह तालुक्यातील कुणबी समाज बांधव महिला भगिनी, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या