विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

२३ विद्यापीठांचे २,००० खेळाडू सहभागी

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव-दि. ३- माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती डॉ. रमेश बैस यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन आमदार भरत  गोगावले यांच्या हस्ते शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता करण्यात आले. हा क्रिडा महोत्सव दिनांक ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान संपन्न होणार आहे.

या क्रिडा महोत्सवात विविध विद्यापीठातील तब्बल २,००० खेळाडू सहभागी झाले आहेत तर सुमारे ५०० संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक तयारीनिशी हजर झाले आहेत. कबड्डीचे एकूण ४१ मुला - मुलींचे संघ, खो - खो चे ३८ मुला - मुलींचे संघ, फुटबॉलचे मुला - मुलींचे २७ संघ आणि बुध्दीबळाचे ३६ संघ सहभागी झाले आहेत. विद्यापीठाच्या तब्बल १० एकर विस्तीर्ण सपाट मैदानावर या स्पर्धा ५ दिवस सुरू राहणार आहेत. या क्रिडा महोत्सवाची जय्यत तयारी २ महिन्यांपासून सुरू केली होती. 

राज्यपाल कार्यालय राजभवन यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीच्या मार्गदर्शनाखाली कुलगुरू डॉ. कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड यांच्या निर्देशानुसार विद्यार्थी आणि खेळाडू यांना आवश्यक असणार्या सोयी सुविधा पुरविण्याची तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. याबाबत खेळाडूंनी अत्यंत समाधान व्यक्त केले आहे. विद्यापीठाच्या मैदानावर सर्वत्र खेळमय वातावरण तयार झाले आहे. सर्व खेळाडू खेळाचा आनंद लुटताना दिसत आहेत.

या क्रिडा महोत्सवाची जबाबदारी मिळणे हा आपल्या विद्यापीठासाठी मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. ही जबाबदारी म्हणजे एक संधी मिळाली आहे. यांचे रुपांतर भविष्यात देश आणि राज्य पातळीवरील क्रिडा स्पर्धां आयोजनासाठी निश्चितच करु असा आत्मविश्वास कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाला आमदार भरत  गोगावले आवर्जून उपस्थित होते. मात्र राज्यपाल डॉ. रमेश बैस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ना. बनसोडे, ना. आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, जिल्ह्यातील आमंत्रित आमदार काही कारणास्तव उपस्थित न राहिल्याने खेळाडू नाराजी व्यक्त करीत होते. मात्र स्पर्धांचे नेटवर्क, नेटके नियोजन आणि व्यवस्थापन उत्तम प्रकारे झाल्याने खेळाडू समाधान व्यक्त करीत होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या