कु. सिद्धी मयुरी महादेव घाडगे 'रायगड रत्न कला गौरव २०२४' पुरस्काराने सन्मानित
माणगांव-दि. २८- रायगड सांस्कृतिक कला मंडळ आयोजित 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' दि. २६ जानेवारी रोजी कार्यक्रमा वेळी कु. सिद्धी मयुरी महादेव घाडगे हिला खा. सुनील तटकरे, आ.भरत गोगावले, ऍड. राजीव साबळे, आयोजक डॉ. अजय मोरे यांच्या हस्ते 'रायगड रत्न कला गौरव २०२४' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व पराक्रमाने पावन झालेली आपली कोकण भूमी. याच कोकणातील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील एक हुन्नरी कलाकार, वक्तृत्वाची पुजारी, छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे जिच्या श्वासात, बोलण्यात व चालण्यात आहे, अशी सिद्धी मयुरी महादेव घाडगे, वय वर्ष फक्त १६. वक्तृत्व ,पोवाडा गायन, अभिनय आणि अजून बरेच काही कलागुण जिच्या अंगी भिनलेले आहेत. आपल्या अमोघ वाणीने शिवशंभू भक्तांना मंत्रमुग्ध करून छत्रपतींचा दौदीप्यमान इतिहासाचा प्रसार आणि प्रचार करून हे वय किती मौक्याच असते हे सिद्ध करणारी शिवकन्या म्हणजे सिद्धी घाडगे. मूर्ती लहान पण कीर्ती महान; या उक्तीस आपल्या कार्यकर्तृत्वाने सिद्ध करणारी अशी रायगडची तोफ. अगदी वयाच्या दहाव्या वर्षी वक्तृत्व क्षेत्रात पदार्पण करून विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन तिने पारितोषिके मिळविली आहेत. त्याच सोबत वेशभूषा, पोवाडा गायन ह्या स्पर्धेत आपल्या अमोघवाणीने अनेक लोकांच्या मनावर तिने अधिराज्य गाजवले आहे. अगदी कमी वयात महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक शिवदिनविशेष हा उपक्रम तिने हाती घेतला व शिवरायांचा इतिहास घराघरात मनामनात, पोहोचवण्याचे बहुमूल्य काम केले. वयाच्या १४ व्या वर्षीपासून त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य, या यवतमाळ येथे स्थापन झालेल्या संस्थेत रायगड जिल्हा प्रवक्त्या तसेच शिवधर्म फाउंडेशन या संस्थेची रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. गावोगावी शिव व्याख्यान करून लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिव संस्काराचे बीज पेरून लोकजागृती करत आहेत. आज विद्यार्थ्यांच्या मध्ये इतिहास या विषयाची आवड निर्माण व्हावी व शिवरायांचा इतिहास मना मनात रुजावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या शिव शंभू ऐतिहासिक लेखी परीक्षा रायगड जिल्ह्यात २०२१ साली पनवेल व गोरेगाव या केंद्रात घेण्याचं काम केले. पठनाट्य द्वारे घरोघरी शासनाकडून राबवणार्या कल्याणकारी शासकीय योजना पोहोचवल्या व केवळ वक्तृत्वासोबतच वेशभूषा, लेखन याच्या माध्यमातून नवरात्र उत्सव मध्ये महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून त्यावर लेख लिहून सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या तरुण पिढीच्या समोर मांडण्याचे काम सिद्धी ने करून दाखवले. वृक्ष लागवड, शिक्षणाचे महत्व त्याच सोबत सामाजिक समस्या यावर सतत ती बोलत राहते. इथेच न थांबता अभिनय क्षेत्रात सुद्धा तिने आपला ठसा उमटवला आहे. शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केले. कोरोनाच्या महामारी मध्ये जेव्हा संपूर्ण जग थांबलं होतं त्याचवेळी आपल्या कलेच्या जोरावर गरुडछेप घेत सोशल मीडियाद्वारे मनोरंजन आणि लोकजागृती करण्याचे काम तिने केले आहे.शाहू छत्रपती फाऊंडेशन , कोल्हापूर आयोजीत युवा वक्ता महाराष्ट्राचा या स्पर्धेची विजेती. अहमदनगर येथे आयोजीत करण्यात युवामंथन करंडक याची विजेती. तसेच रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पोवाडा गायन स्पर्धा प्रथम क्रमांक. पुणे येथे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली आयोजीत राज्यस्तरीय कलाउत्सव येथे मी सावित्री बोलते! या एक पात्री अभिनयाचे सादरीकरण केले आहे.
'दमदार विद्यार्थी फक्त महाराष्ट्र २०२०' हा पुरस्कार यवतमाळ येथे महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते देण्यात आला आहे. रायगड रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर सिद्धी घाडगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मला हा पुरस्कार मिळाला याचे सर्व श्रेय मी माझ्या आई वडिलांना राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम तसेच सर्व माझ्या शाळेतील शिक्षकांना देईन. शिवरायांचा इतिहास मला घराघरात माझ्या कलेतून पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे माझ भाग्य समजते. माणगांव तालुक्यातील तीच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




0 टिप्पण्या