'महाराष्ट्राची हास्य जत्रा' माणगांवात
माणगांव-दि. १२- सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला व लॉकडाऊनमध्ये एकमेव चालणारा धमाल विनोदी कौटूंबिक कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' हा कार्यक्रम (लाईव्ह) सर्व कलाकारांसह दि. २६ जानेवारी रोजी सायं ठीक ६.०० वा. अल्ताफदादा धनसे मैदान, मोर्बा रोड, माणगांव येथे होणार आहे. सदर कार्यक्रमास पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, माणगांवचे प्रमुख नेते अॅड.राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, जिल्हा अधिकारी, जिल्हा अधीक्षक, प्रांत, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, माजी नगराध्यक्ष आनंद यादव तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा,उद्योग या क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रायगड सांस्कृतिक महोत्सव २०२४ या कार्यक्रमात सुरुवातीच्या उदघाटन समारंभ कार्यक्रमा आधी रायगड मधील गाजलेल्या काही ठराविक व निवडक कलाकारांची कला सादर होणार असून त्यांचा रायगड रत्न कला गौरव २०२४ या पुरस्काराने मान्यवर व असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीत सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर धमाल विनोदी व कौटुंबिक तसेच बीपी, शुगर व टेंशन कमी करणारा सर्वाचा लाडका व आवडता कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सुरु करण्यात येईल. सदर कार्यक्रम अडीच तास रंगणार आहे. सदर कार्यक्रमास विनोदी अभिनेते हास्य सम्राट व प्रमुख कलाकार समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवाली परब, चेतना भट, वनिता खरात, अरुण कदम, प्रभाकर मोरे, ओंकार राऊत, शामसुंदर राजपूत, पृथ्वीक प्रताप, प्रथमेश – श्रमेश आणि गोड अभिनेत्री व कार्यक्रमाची सूत्रसंचालिका व प्रमुख आकर्षक प्राजक्ता माळी येणार आहेत.
सदर कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचे असून सदर कार्यक्रमाचा खर्च खूप मोठा असल्या कारणाने सदर कार्यक्रम देणगी, जाहिरात व लोकवर्गणीतून (प्रवेश देणगी सन्मानिका) यातुन करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास मुंबई, पुणे, पनवेल, अलिबाग, पेण, तळा, मुरुड, म्हसळा, श्रीवर्धन, दापोली, मंडणगड, खेड,पोलादपूर, बिरवाडी, महाड,पाली, खालापुर तसेच माणगांव तालुक्यातून जवळ जवळ पंधरा हजारहुन जास्त हौशी व दर्दी नाट्य रसिक उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रम मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रातील भव्य दिव्य स्वरूपाचे असून रायगड मधील जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी आपल्या कुटूंबासह सदर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन माणगाव मधील सांस्कृतिक कार्य चळवळीचे कार्यकर्ते डॉ. अजय आत्माराम मोरे यांच्या अष्टविनायक कला अकादमी, माणगांव या संस्थेमार्फत व आयोजक यांच्या मार्फत करण्यात येत आहे.




0 टिप्पण्या