कळमजे गावच्या २२ वर्षीय ऋतिक चा सर्पदंशाने मृत्यू
माणगांव-दि. ६- माणगांव तालुक्यातील बामणोली ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या कळमजे गावातील एका २२ वर्षीय युवकाचा अज्ञात विषारी सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, माणगांवनजीक असणाऱ्या कळमजे या गावातील ऋतिक संजय वाढवळ वय वर्षे २२ याला दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ३ वाजण्याच्या सुमारास तो शेतामध्ये काम करीत असताना त्याला कोणत्यातरी विषारी सापाने दंश केल्याने त्याला उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता ऋतिक वाढवळ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशा अल्पशा वयात ऋतिक चा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची वार्ता समजताच वाढवळ कुटुंबिय संपूर्ण कळमजे गावं आणि पंचक्रोशी तसेच आप्तेष्ट नातेवाइकांमध्ये एकच शोककळा पसरली व हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
या घटनेची नोंद माणगांव पोलीस ठाणे येथे अ. मृ. रजि. नं. ४४/२०२३ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सचिन निमकर हे करीत आहेत.



0 टिप्पण्या