क्रीडा सराव सुरु असताना भाला घुसून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू
गोरेगाव-दि. ६- शाळेच्या तालुका क्रीडा स्पर्धेचा सराव सुरु असताना फेकलेला भाला एका विद्यार्थ्याच्या डोक्यात घुसून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी घडली.हुझेफा कुतुबुद्दीन डावरे (वय १५, रा. दहिवली कोंड) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आय. एन. टी. स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत आहे.
गोरेगांव पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरार येथील आय. एन. टी. स्कूलमध्ये तालुका क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धेचा भालाफेकीचा सराव सुरु असताना हुझेफा डावरे हा सराव बघत असताना, तो काही क्षणासाठी वाकला असता, फेकलेला भाला तेथे वाकलेल्या हुझेफाच्या डाव्या कानशिलाच्यावर मेंदूमध्ये घुसला. हुझेफाला गोरेगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता, डॉ. विनोद गोरेगांवकर यांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंंतर या हुझेफा डावरेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेची नोंद गोरेगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास हे करित आहेत.




0 टिप्पण्या