वृद्धेचा आधार बनले माणगांव पोलीस
माणगांव-दि. ३०- माणगांव पोलीस ठाणे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. मग ते मनोरुग्णांना उपचार करीता पाठविणे, जीवनावश्यक वस्तू मदत करणे ई. कोणत्या ना कोणत्या मार्गाने माणगांव पोलिसांचे समाज कार्य चालूच असते. अशाच एका माणगांवातील वृद्ध महिलेचा माणगांव पोलीस आधार बनले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. २९ मार्च रोजी दु. २ वा. च्या सुमारास अनुसया बाबुराव देशमुख, वय ९० वर्ष ह्या माणगांव पोलीस ठाणे येथे आल्या. माझे कोणी नातेवाईक जिवंत नसून माझ्या राहण्याची सोय करा असे सांगितले. तेव्हा पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. सतिश अस्वार, पो. उप नि. विक्रांत फडतरे, पो. ह. किरण तुणतुणे, किशोर कुवेस्कर, मिलिंद खिरीट, प्रीती ओमले, पो. शि. गोविंद तलवारे, राम डोईफोडे, दिपाली मोरे यांनी त्यांची आस्तेवाईकपणे चौकशी केली असता त्या रागाच्या भरात घरातून निघून आल्याचे समजले. तेव्हा त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मुलगी सीमा कदम व जावई रमेश कदम रा. उतेखोल यांच्याकडे नेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वृद्ध महिलेने मी घरी जाणार नाही, मला घरी सोडले तर मी जीव देईन असे सांगितले. त्यामुळे सदरील वृद्ध महिला घरी राहण्याच्या मनस्थितीत नसल्याने तिला माऊली वृद्धाश्रम निजामपूर येथे दाखल करून तिच्या नातेवाईकाना काळजी घ्यावयास सांगितले. माणगांव पोलिसांनी केलेल्या या कार्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.




0 टिप्पण्या