स्त्री रोग तज्ञ असून नसल्यासारखे; त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना
जैशी अवस्था माणगांव उपजिल्हा रुग्णालयाची तैसेची अवस्था अलिबाग जिल्हा रुग्णालयाची
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि.३०- माणगांव उपजिल्हा रुग्णालय हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून मुंबई गोवा महामार्गालगत आहे. हे रुग्णालय १०० खाटांचे असूनही बऱ्याच रूग्णांना उपचार व आरोग्य चाचण्यांविना येथील खाजगी दवाखान्यात जाऊन जास्त फी मोजावी लागत आहे. या रुग्णालयात सध्या एकही स्त्री रोग प्रसूती तज्ञ कार्यरत नाही. अनेक गरीब रुग्णांना उपचारासाठी दारोदार फिरावे लागत आहे. या गैरसोयिनबाबत अनेक वेळा तीव्र संताप ही व्यक्त करून आंदोलनेही झाली आहेत. मात्र या गरिसोयीनकडे अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीनी लक्ष न दिल्यामुळे रुग्णांना नाहकचा त्रास सहन करावा लागत आहे.
माणगांव उपजिल्हा रुग्णालयात एक स्त्री रोग तज्ञ असून त्यांचा उपयोग काहीच होताना दिसत नाही. या वर्षभरात डॉक्टरांनी एकाही गर्भवती महिलेची सिझिरीअन केले नाही. सिझिरीअन करण्याची वेळ आली तर त्या महिला रुग्णाला अलिबाग येथे हलविण्याचा सल्ला देतात. त्यामुळे महिला रुग्ण घाबरून जाऊन खाजगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होतात. त्यामुळे सिझीरीअन करण्यास येथील खाजगी डॉक्टर ४० ते ५० हजार रु. शुल्क आकारतात. प्रसूती दरम्यान गर्भवती महिला आणि पोटातील बाळ यांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने अशा प्रकारच्या रुग्णांचे नातेवाईक प्रसंगी कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून, जमिनीचा तुकडा विकून, अव्वाच्या सव्वा व्याजाने उसनवारी करून या खाजगी डॉक्टरांची तिजोरी भरण्यास भाग पडते.
गेले वर्षभर महिला रुग्णांची मोठी हेळसांड व गैरसोय होत असल्याने आणि अनाठायी नाहक खर्च होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रसूतीचे काम न करणाऱ्या या डॉक्टरांची बदली करून स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना या उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी घेण्यात यावे अशी मागणी केली आहे. येथील स्थानिक डॉ. सिद्धी कामेरकर व डॉ. श्रुती निकम या अत्यंत उत्कृष्टपणे महिलांच्या प्रसूती अत्यंत सुलभ पद्धतीने करीत होत्या. बहुतेक प्रसूती नैसर्गिक होत होत्या. त्यामुळे या रुग्णालयात महिन्याला सुमारे २५० ते ३०० प्रसूती होत होत्या. त्यामुळे अनेक महिलाच्या नातेवाईकांच्या पैशाची बचत होत असे. आता मात्र स्त्री कक्षामध्ये एक ते दोनच नाईलाजाने आलेल्या गरीब महिला प्रसूतीसाठी दाखल आहेत. मात्र त्यांच्या प्रसूती तेथील परिचारिका व महिला कर्मचारी देवावर विश्वास ठेवून रामभरोसे करीत आहेत. या स्त्री कक्षामध्ये अनेक गैरसोयी आहेत. शौचालय स्वच्छ नसते. त्याचा त्रास महिला रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना होतो. त्यावर कोणतीही उपाययोजना केलेली नाही. मुंबई गोवा महामार्गावर अपघात झाल्यास या रुग्णालयात संबंधित कोणत्याही सोयीसुविधा व यंत्रणा नसल्याने त्यांच्यावर जुजबी उपचार करून मुंबई, पुणे येथे हलविण्याचा सल्ला देतात. मात्र काहींची प्राणज्योत वाटेतच मावळते.
या व्यतिरिक्त अनेक गैरसोई असल्याने दक्षिण रायगड मधील सर्व रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे रुग्णांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. पुरेसा कर्मचारी वर्ग भरलेला नाही. तसेच सफाई कामगार कमी आहेत. त्यामुळे रुग्णांना खाजगी रुग्णालयात जाऊन अधिक शुल्क भरावे लागत आहे. नवीन आलेली आरोग्य तपासणी मशीन बंद ठेवण्यात आलेली आहे. त्याचा लाभ अद्याव पर्यत कोणालाच झालेला नाही.
या उपजिल्हारुग्णालयात कायमस्वरूपी स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ म्हणून डॉ धनंजय शिंदे हे नियुक्त आहेत मात्र ते कायमस्वरूपी गैरहजर असतात अशी माहिती उपजिल्हारुग्णालय प्रशासनाकडून मिळालेली आहे. तर कंत्राटी पध्दतीने कार्यरत असणाऱ्या डॉ सिद्धी कामेरकर यांनी केलेल्या कुटुंब नियोजन शस्तक्रीयेची जिल्हा शल्यचिकित्सक अलिबाग यांनी रिकव्हरी लावली असल्याने ते मान्य नसल्याने डॉ सिद्धी कामेरकर यांनी राजीनामा दिला आहे तर, कंत्राटी पध्दतीवर असलेल्या दुसऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉ श्रुती निकम ह्या मागील ६ दिवसापासून कौटुंबिक कारणामुळे रजेवर आहेत व अजून पुढे किती दिवस रजेवर राहतील हे सांगता येणे शक्य नाही अशी माहिती देखील उपजिल्हारुग्णालय माणगांव प्रशासन वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप पगारे यांच्याकडून देण्यात आली आहे.
स्त्री रोग व प्रसूती तज्ञ नसल्याने स्त्री रोग विभागातील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांचे नातेवाईक कर्मचाऱ्यांना बेहाल करत आहेत. माणगांवचे अधिक्षक म्हणाले की आम्ही प्रसूती रुग्ण अलिबाग कडे स्थलांतर करायचे म्हटले तर अलिबाग कडून सांगण्यात आले आहे की,रुग्ण पाठवू नका इकडे देखील स्री रोग तज्ञ व प्रसूती तज्ञ डॉ नाहीत. त्यामुळे आम्ही थेट MGM रुग्णालयात रुग्ण पाठवत आहोत. म्हणजे जैसी परिस्थिती उपजिल्हा रुग्णालयाची ...त्यापेक्षा ही बेनाम रायगड जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग ची अशी अवस्था झाली आहे.त्यामुळे आता महिलांनि आरोग्य सेवेसाठी न्याय तरी कुणाकडे मागायचा? अशी अवस्था निर्माण झाली आहे.
या ठिकाणी कार्यरत असणारे डॉ. संतोष कामेरकर (जनरल सर्जन) यांच्या कडे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले मी माझ्या कामाशी निगडित असणारे हर्निया, अपेंडीस, अल्सर तसेच इतर शस्त्रक्रिया करतो. आरोग्य विभागांनी मला आदेश दिले तर मी प्रसूती विभागातील काम पाहू शकतो. उपजिल्हा रुग्णालयाबाबत आ. भरत गोगावले यांच्याकडे तक्रार देऊन डॉ. कामेरकर, बी. एस. सावंत व डॉ. सिद्धी कामेरकर यांनी अधिवेशनात जाऊन आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन दाद मागितली आहे.




0 टिप्पण्या