पुणे दिघी महामार्गावर अवजड वाहतूक बंदी
मग जेटीएल कंपनीच्या कॉईल वाहतुकीला कुणाचा वरहस्त?
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि.३- माणगांव तालुका आणि शहरातुन पुणे -दिघी महामार्ग जातो. या महामार्गावर निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील कोस्ते बुद्रुक मध्ये असणाऱ्या जेटीएव (जैन ट्यूब लि.) या कंपनीसाठी जाणाऱ्या स्टील कॉईलची वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. मागील काही दिवसांपासून या कॉईल वाहतूक करणारे ट्रेलर रस्त्यामध्येच बंद पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हे ट्रेलर नेमके चढाव आणि उतार या ठिकाणीच बंद पडत असल्याने एकतर आगोदर ओव्हरलोड वाहतूक आणि त्यामध्ये हे जुने आणि बंद पडणारे ट्रेलर यामूळे भयावह अपघात घडू शकतो. यावरून निजामपूर विभागातील सर्वपक्षीय पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
असाच एक प्रकार दि. ३ फेब्रुवारी रोजी माणगाव निजामपूर रोडच्या मध्यभागी पाणोसे पुलाच्या पुढील भागात घडला. यामध्ये मातेश्वरी ट्रान्सपोर्टचा ट्रेलर क्रमांक एम एच ४६ ए आर १८६६ हा ऐन चढावी घाटात बंद पडला. या ट्रेलर मध्ये एकुण ३६.८२० कि. च्या ३ लोखंडी कॉईल होत्या. ह्या अपघातात जर कॉईल निसटुन खाली आल्या तर ४० ते ५० जणांना प्राण गमवावे लागले असते. या घटनेकडे निजामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महेश शिर्के यांनी लक्ष वेधले. व तात्काळ माणगांव पोलीस ठाणे येथे संपर्क साधला. यावेळी सपोनि लहांगे व पो. ह. गोविंद तलवारे व पोलीस नाईक मिलिंद खिरीट घटनास्थळी दाखल झाले.
एकतर ओव्हरलोड वाहतूक आणि प्रशासनाने वाहतुकीसाठी दिलेला मार्ग वेगळा. या कॉईलच्या वाहतूकीसाठी कोलाड-विळे -निजामपूर असा मार्ग देण्यात आला आहे. तरी देखील रात्री अपरात्री तर सोडाच पण आता दिवसा-ढवळ्या देखील या मार्गावरुन ही अवजड वाहतूक सुरू आहे. बऱ्याच वेळा हे ट्रेलर ड्रायव्हर जेटीएल कंपनीचे असून देखील पोस्को कंपनीची ही कॉईल असल्याचे सांगत असतात. ही गोष्ट माणगांव मधील सुजाण पत्रकारांनी देखील माणगांव वाहतूक पोलीस शाखेच्या निदर्शनास आणून दिली आहे.
मात्र दि. ३ फेब्रुवारी रोजी निजामपूर विभागातील सर्वपक्षीय नागरिक एकवटले, आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये प्रामुख्याने निजामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महेश शिर्के, भाजप माणगांव तालुका सरचिटणीस गोविंद कासार, राष्ट्रवादी युवा नेते सागर खानविलकर, मनसे तालुकाध्यक्ष प्रतीक राहटे, शिवसेनेचे सचिन मोरे, कोस्ते खुर्द माजी उपसरपंच जयप्रल्हाद आमोणकर यांचा समावेश होता. या नागरीकांनी स्थानिक ग्रामस्थ म्हणून एकत्र येत या कंपनीच्या अवजड आणि कॉईल वाहतुकीला विरोध कर, या ठिकाणी अपघात घडला तर जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.
या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देताना माणगांव पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, संबधित आरटीओ विभागाशी समनव्य साधून सदर ट्रान्सपोर्ट विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. मात्र सततच्या होणाऱ्या या अवजड वाहतूक आणि नेहमी माणगाव शहरात होणारी वाहतूक कोंडी यामूळे त्रस्त झालेले नागरिक एकत्र झाले. जेटीएल कंपनीने या मार्गावरील ही कॉईल वाहतूक बंद करावी अन्यथा संबंधित प्रशासनच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. व या अवैध अवजड वाहतुकीवर कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल देखील उपस्थित नागरीकांनी उपस्थित केला आहे.




0 टिप्पण्या