मुंबई गोवा महामार्गावर एस टी बस व मिनीबसमध्ये अपघात; ८ जखमी, तर दोन गंभीर जखमी

 मुंबई गोवा महामार्गावर एस टी बस व मिनीबसमध्ये अपघात; ८ जखमी, तर दोन गंभीर जखमी.

पोलीस प्रवाह न्यूज

माणगांव -दि. २३-  जितके वर्षे काम रखडले आहे तितके वर्षे मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा व जीवघेणा बनला आहे. मागील काही दिवसांपूर्वी माणगांव तालुक्यातील रेपोली हद्दीत झालेल्या भीषण अपघातात १ बालकासह ९ जण असा एकाच कुटुंबातील १० जणांना जीव गमवावा लागला होता. दि. २२ फेब्रुवारीच्या रात्री मुगवली गावच्या हद्दीत एसार पेट्रोल पंपच्या समोर रात्री १:१५ वाजण्याच्या सुमारास एस टी बस व टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. मात्र जीवित हानी टळली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावरून पुणेकुडून महाडकडे चाललेली मिनी बस टेम्पो ट्रॅव्हलर क्रं एम एच १४ सी डब्ल्यू ५५०८ व महाड बाजूकडून मुंबई नालासोपाराकडे जाणारी एस टी बस क्रं एम एच २० बी एल१८३४ यामध्ये अपघात झाला. यामध्ये टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस मधील एकटाच असणारा चालक दिनेश घबाड रा .काळे वाडी पिंपरी चिंचवड पुणे हा व एस टी मधील प्रवासी विनायक विष्णू साटम हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये मिनी बस चालक यांना पुणे येथे तर गंभीर जखमी एस टी प्रवासी यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे .यांच्यासह एस टी बसमध्ये असणारे इतर ६ प्रवासी देखील जखमी झाले.

या अपघाताचे वृत्त समजताच माणगांव पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार रावसाहेब कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.  जखमींना उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात हलविले. सदर अपघाताची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास माणगांव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव पोलीस करीत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या