काजू उद्योग प्रक्रियेसाठी तरुणांचा सहभाग वाढविणार
काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबेंनी कोस्ते येथील उद्योगाला भेट
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. २५- रायगड जिल्ह्यात माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या डोंगराळ व दुर्गम भागात कोकणी काजू मोठ्या प्रमाणात पिकतो. यात वनविभाग तसेच मालकी असणारे फळबाग शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात काजू तयार होतो. या तयार काजूगरावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग पुरेसे नसल्याने हा काजू रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, खेड, रत्नागिरी, चिपळूण तसेच तळ कोकाणात पाठवले जातात. रायगड जिल्ह्यात उद्योग अल्प प्रमाणांत असल्याने काजूगर उद्योग प्रक्रियेला रायगडात खीळ बसत आहे. शासनाच्या विविध योजनातून सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट यांना अशा उद्योगांना मार्गदर्शन करीत त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी कोस्ते बु. येथील काजूगर उद्योग प्रक्रियेला भेट देवून दिली.
माणगाव तालुक्यातील रवाळजे, पाटणूस, खरवली, पेण, मुगवली, माणगाव व कोस्ते बु. या सात ठिकाणी काजूगर उद्योग प्रक्रिया सुरु असून कोस्ते बु. येथील प्रतिक यशवंत गायकवाड, या २८ वर्षाच्या तरुणाने बीएससी पर्यत शिक्षण घेतल्यानंतर एका खाजगी कंपनीत ६ वर्ष काम केले. कोरोना काळाच्या महामारीने त्याचा रोजगार हिरावला त्यानंतर तो शांत बसला नाही. २१ दिवसाचे ठाणे जिल्ह्यात त्याने वेगेवेगळ्या उद्योगधंद्याबाबत प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्याने आपला कोस्ते बु. या गावी स्वत:चा व्यवसाय स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून कच्चा काजूमाल आणून व्यवसाय सुरु केला. त्या उद्योग प्रकियेला पंकज तांबे तसेच सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील शिर्के यांनी भेट देवून या प्रक्रियेतील येणाऱ्या अडचणी तसेच बाजारपेठ याबाबत व्यथा जाणून घेतल्या. शासनाकडून भांडवल जास्तीत जास्त तरुणांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले.
पुरेसे भांडवल तरुणानाकडे नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांची भटकंती दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कष्ट व मेहनत घेणाऱ्या हातांना काम मिळते असे श्री. तांबे यांनी या लघु उद्योजकांना ठाम सांगितले. कोकणात मोठ्या प्रमाणांत काजूचे उत्पादन होते. तळ कोकणात वेंगुर्ला काजू, ४, ७, ८ या वाणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र रायगड जिल्ह्यात जंगली, गावठी (कोकणी काजू) मोठ्या प्रमाणांत फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात पिकतो. या हा काजू चवीला स्वादिष्ट असल्यामुळे या काजुगराला मागणी जास्त आहे. काजूचा दर ग्रेड नुसार ठरविला जात असून कमी जास्त भाव होत असतात. रायगड जिल्ह्यात काजू बागाचे क्षेत्र तीन हजार एकशे पंचवीस हेक्टर आहे. या झाडाला सरासरी चार ते पाच वर्षे लागवडीपासून फळ देण्यास वेळ लागतो. एक झाड चौदा ते वीस किलो सरासरी काजू बियांचे उत्पादन मिळवून शेतकऱ्यांना देत असते. रायगड जिल्ह्यात तीन हजार एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्राची नोंद काजू पिकाची असली तरी जंगल व अन्य ठिकाणीही काजूची झाडे मोठया प्रमाणात आहेत. यांच्या झाडापासून बासष्ट हजार पाचशे मेट्रिक टन काजू बिया मिळू शकतात. त्यापासून पंधरा हजार सहाशे पंचवीस किलो निव्वळ काजूगर विक्रीसाठी निघू शकतो.
ग्रेड डब्लू १८० वाणाचा हा घाऊक १०५० ते १२०० रु. दर आहे, ग्रेड डब्लू २१० या वाणाचा ८६० ते ९०० रु. घाऊक दर, ग्रेड डब्लू २४० या वाणाचा ७६० ते ८०० रु दर आहे. हे दर कमी जास्त होत असतात. एका क्विंटल मागे २५ किलो, काजूगर निव्वळ उत्पादन विक्रीसाठी मिळते. सध्या या काजुगरांचा एक हजार रुपये ते बाराशे रुपये सरासरी भाव बजारात किलोसाठी चालू आहे. हा उद्योग सुरु करण्यासाठी व उद्योजक सुशिक्षित बेरोजगार यांना शासनाने व बँकांनी विशेष भरीव अर्थसाह्य दिल्यास रायगड जिल्ह्यात या व्यवसायाला भविष्यकाळात सुगीचे दिवस येतील व रायगड जिल्हा राज्याच्या व देशाच्या नकाशावर काजूगरांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, सध्या या काजूगरांना विविध सण, हॉटेल्स, व श्रीमतांचे खाणे म्हणून बघितले जाते. याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे काजूगर म्हटले की, वृद्धापासून तरुणांपर्यंत तोंडला पाणी सुटते.



0 टिप्पण्या