भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पोह रमेश कुथे यांना कांस्य पदक
रायगड-दि. २५- मध्यप्रदेश राज्यात भोपाळ येथे पार पडलेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात रायगड जिल्हा पोलीस दलातील पो. ह. रमेश कुथे यांनी आपली ‘‘अक्सेस कंट्रोल’’ हया प्रकारामध्ये वैयक्तीक सर्वाच्च कामगिरी करत कांस्य पदक प्राप्त करून रायगड जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
दि. १३ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान भोपाळ, मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या ६६ व्या अखील भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात एकुण २४ राज्यांच्या पोलीस संघांनी भाग घेतला होता. या मेळाव्यात तामिळनाडू राज्याला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले असुन महाराष्ट्र राज्यातील पोलीस संघाने १ सुवर्ण पदक, ४ रजत पदक व ६ कांस्यपदक अशी एकुण ११ पदकांसह ‘अन्टीसबोटेज चेक विनर्स ट्रॉफी’, ‘ सायंटीफिक एड टू इन्व्हेस्टीगेशन’ ची रनरअप ट्रॉफी मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र पोलीस संघात ३१ पोलीस अधिकारी/अंमलदार, ७ श्वान व १२ श्वान हॅंन्डलर यांचा समावेश होता.
पोह रमेश कुथे यांनी सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे प्रतिनिधीत्व करीत ‘‘ अॅक्सेस कंट्रोल ’’ प्रकारात ३ मिनीटांची प्रात्यक्षीक परिक्षा व लेखी परिक्षेमध्ये एकुण ९८.१ गुण प्राप्त करीत कांस्य पदकावर आपले नाव कोरून देशस्तरावर रायगड जिल्हयाचे नाव उंचावले आहे.
काय आहे ‘‘ अॅंटी सबोटेज अॅक्सेस कंट्रोल ’’-
ही स्पर्धा गर्दीमध्ये संशयास्पद वस्तु घेवून जाण-या व्यक्तीला हेरून घातपात रोखण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी आयोजीत केली जाते, या स्पर्धेत स्पर्धकाला एकुण ३ मिनिटाचा कालावधी दिला जातो. स्पर्धेपुर्वी संशयास्पद वस्तू स्वतःच्या पेहराव अथवा शरीरावर लपवून एक व्यक्ती गर्दीमध्ये मिसळली जाते. स्पर्धकाला दिलेल्या नियोजित वेळेपैकी कमीत कमी वेळेत सदर व्यक्तीला शोधून दाखवायचे असते.
रमेश कुथे यांची थोडक्यात माहिती:-
पोलीस हवालदार रमेश कुथे हे सन २००७ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलात भरती झाले असुन सध्या बॉम्ब शोधक व नाशक पथक रायगड-अलिबाग येथे आपले कर्तव्य बजावत असुन बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे देशपातळीवरील व राज्य पातळीवरील असे एकुण ३८ प्रशिक्षण पुर्ण केले आहे. आपल्या सेवा कालावधीत त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील राज्यस्तरावरील झालेल्या विविध घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे भाग घेवुन २ सुवर्ण पदक व २ रजत पदक व १ कांस्य पदक प्राप्त करून रायगड पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे.
पोह रमेश कुथे यांनी देशपातळीवर जावुन केलेल्या हया उल्लेखनिय कामगिरीचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे व भविष्यात देखील अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करून उज्वल कामगिरी कराण्याकरीता शुभेच्छा दिल्या.

.jpg)


0 टिप्पण्या