वैजनाथ महादेव मंदिरात भक्तीसागर लोटला !
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १८- माणगांव पासून साधारण आठ किलोमीटर अंतरावर गांगवली हे ऐतिहासीक गाव असून इतिहास कालीन नाव गांगोली असे होते. याच ठिकाणी प्राचीन वैजनाथ महादेव मंदिर असून या मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्री उत्सव साजरा होतो. या वर्षीचा महाशिवरात्री उत्सव शनिवार, ता. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरा करण्यात आला. या पालखी सोहळ्यात सहभागी होत कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी प्राचीन कालीन वैजनाथ महादेवाचे दर्शन घेतले. या वर्षीचा महाशिवरात्री उत्सवाच्या पुजेचा मान दत्ताराम गणू दाखिणकर यांचेकडे होता. या दिवशी हजारो भाविक माणगाव तालुक्यातूनच नव्हे तर अखंड रायगड जिल्ह्यातून प्राचीन वैजनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्री दिनी हजारो भाविक खास दर्शनाठी आले होते. यावेळी ग्रामस्थ व उत्सव कमिटी तर्फे सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी ग्रामस्थामार्फत महाप्रसादाची खास सोय करण्यात आली होती.
या महाशिवरात्री उत्सवा दिनी शिवरात्री उत्सवात भजन, शिवनामाचा गजर दिंडी सोहळा अगदी पाहण्यासारखा होता. या यात्रेतील प्रसिद्ध प्रसाद खजूर, शेंगा भाविक आवडीन खरेदी करतात. या यात्रेत खाऊची दुकाने, मिठाईची दुकाणे, भाजीपाला, कलिंगड आदी पदार्थांची रेलचेल असते. मनोरंजनाकरिता चक्र, पाळणे, घोडागाडी यांची पर्वणी असते. तसेच मंदिरासमोरील घाट पाय-यांवर उत्सवाच्या दिवशी बेल, फुल विकण्याकरिता लहान मूलांची दुकाने थाटलेली असतात. तसेच समोर विस्तीर्ण नदीचे पात्र शिवकालीन घाटपायऱ्या तसेच शेजारी कालभैरव मंदिर कालकाई मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर अगदी समोरचं सुबक अशी नंदी, कासव यांची स्थापना आहे. डाव्या हाताला श्रीगणेश विराजमान असून शेजारी छोटे शिवलिंग आहे. गाभारा प्रवेशद्वारा शेजारी नागदेवता आसन आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या इतिहास कालीन अवशेष परिसरात जतन केले आहेत. त्यामुळे या मंदिराचा परिसर शांत व मनमोहक भक्त गणांना प्रफुल्लित ठेवणारा आहे.
शिवमंदिराच्या विस्तीर्ण अशा सुबक गाभाऱ्यात उतरण्या करिता दगडी पायऱ्या असून आतमध्ये स्वयंभू अशी मनमोहक शिवलिंग आहे. पूर्वेला तीन फुटावर पार्वती माता विराजमान आहेत. शिवमंदिराचा गाभारा दगडी बांधकामाचा विशेष नमूना असून पुरातन आहे. प्रत्येक दगडावर नक्षी काम केलेले आहे. वैज्ञनाथ महादेव मंदिरात एकाग्रतेने बसल्यास फार मोठे समाधान लाभते. दि. १८ फेब्रुवारी शनिवारी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. पहाटे ५.०० वाजेपासून रात्री १२.०० वाजेपर्यंत दूरदूरून पर्यटन भक्तगण आपल्या लाडक्या वैजनाथ महादेवाच्या दर्शनासाठी आला होता. तसेच गांगवली सरपंच सौ. नेहा रामदास दाखिणकर यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत गांगवली यांनी सार्वजनिक मुतारी व शौचालयाची सोय मंदिर परिसरात केली होती. यावेळी स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड तसेच मंदिराचे विश्वस्त ज्ञानदेव दाखिणकर, मारुती दाखिणकर, संतोष दाखिणकर, वामन दाखिणकर, विष्णू दाखिणकर, संदीप दाखिणकर, संजय दाखिणकर तसेच स्वयंसेवक गणेश सवादकर, काशिनाथ दाखिणकर, रामदास दाखिणकर, रामचंद्र दाखिणकर, बाळकृष्ण दाखिणकर, रुपेश दाखिणकर, गणेश दाखिणकर, रामदास हिरू दाखिणकर आदी स्वयंसेवक परिश्रम घेत होते.




0 टिप्पण्या