माणगांव पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यामुळे अडीच वर्षांनी झाली पिता पुत्राची भेट
आई वडिलांनी सोडली होती मुलगा जिवंत असल्याची आशा
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि.३१- माणगांवमध्ये फिरत असलेल्या अनेक मनोरुग्णांना माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन त्यांना उपचाराकरिता मनोरुग्ण रुग्णालयात पाठविण्यात येत असून त्यातील अनेक रुग्ण बरे होऊन पोलिसांनी त्यांना त्यांच्या परिवाराकडे दिले आहेत. अशाच प्रकारे उत्तर प्रदेश येथील अडीच वर्षांनी पिता पुत्राची भेट घडवून माणगांव पोलिसांनी एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
उत्तर प्रदेश येथील गाझीपूर भागातील एक ३० वर्षांचा मानसिक व आजाराने ग्रस्त असलेला तरुण भरकटत अडीच वर्षांपूर्वी मुंबईत आला. गेली अडीच वर्षे उत्तरप्रदेश येथील ३० वर्षीय तरुण मनजे उर्फ मुलायम राजपूत शिवमुनी हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माणगांव शहरात मनोरुग्ण अवस्थेत फिरत होता. माणगाव पोलिसांना तो भरकटलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांनी कायदेशीर प्रक्रिया करून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात त्याला दाखल केले. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता. मनोरुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झाले त्यावेळी त्याने फक्त दोन शब्द उच्चारले ते म्हणजे 'दिलदार नगर, धनाडी'. यावरून समाजसेवा अधीक्षक स्वाती कुलकर्णी यांनी त्याच्या घराचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्याशी वारंवार संवाद साधून त्याकडून आणखी माहिती घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार गाझीपूरमधील पोलिसांसोबत संपर्क केल्यावर त्यांनी त्याचे घर शोधले. आणि अखेर त्याच्या कुटूंबियांशी संपर्क झाला. कुलकर्णी यांनी कॉलद्वारे त्याच्या कुटुंबाशी साधताच, आईवडील निःशब्द झाले आणि त्यांना रडू कोसळले. "बहुत इसको ढुंढा, मिल ही नही रहा था, हमने इसकी जिने की उम्मीद छोड़ दी थी, हमारा लडका हमे मिलेगा सपने मे भी नही सोचा था," अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. आई वडिलांनी उत्तर प्रदेशवरून मुंबईला येण्यासाठी ट्रेन गाठली. आपल्या मुलाला भेटताच क्षणी कडकडून मिठी मारली. मनोरुग्णालयाकडून आवश्यक कागदपत्रे आणि कपडे मागविले जातात. परंतु त्याच्या वडिलांनी आणले नव्हते.
गरिबीमुळे तक्रारही नव्हती केली!
मुलाला घरी जाण्यासाठी कपडे नसल्याने पित्याने अंगावरचे कपडे त्याला देऊ केले. दारिद्र्य रेषेखालील हे कुटुंब आणि दुर्लक्षित भागात राहत असल्याने त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार देखील केली नव्हती. ते फक्त आपल्या मुलाला शोधतच होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले. सोमवारी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणाची उत्तरप्रदेश येथे घरवापसी झाली.



0 टिप्पण्या