कोकण शिक्षक आमदार विधानपरिषद निवडणूकिसाठी माणगांवमध्ये ९४% मतदान.
माणगांव-दि.-३१- पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधानपरिषद कोकण शिक्षक आमदार पदासाठी ३० जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण ८ उमेदवार रिंगणात होते. तर एकूण ३७ हजार मतदार या ८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करणार होते. यामध्ये खरी चुरस शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील व भाजप चे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मध्ये झाली.
माणगाव तालुक्यात ही मतदान प्रक्रिया मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथे पार पडली. यामध्ये शिक्षक आमदार पदासाठीच्या निवडणूकिकरिता माणगांवमध्ये ४२४ शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यामध्ये १७३ स्त्री मतदार तर २५१ पुरूष मतदार असे मतदार यादीत समाविष्टीत होते. त्यापैकी ३९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. २३६ पुरुष मतदार व १६२ स्री मतदारांचा समावेश होता अशा प्रकारे माणगांव मतदान केंद्रावर एकूण ९४% मतदान झाले.
या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून माणगांव तालुका पुरवठा अधिकारी संजय माने यांनी काम पाहिले. तर मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माणगांव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर अचानक कोणत्याही मतदाराला आरोग्याची समस्या निर्माण झाली तर आरोग्य यंत्रणेकडून रुग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आली होती. अशा प्रकारे माणगांव मधील विधानपरिषद शिक्षक आमदार पदासाठीची निवडणूकीची मतदान प्रक्रिया चोख पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली.



0 टिप्पण्या