भविष्यकाळ महाविकास आघाडीचाच-खा.सुनील तटकरे.
माणगांव- दि. १३- उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड हि बेकायदेशीर होती म्हणणाऱ्यांना त्यांच्या एबीपी फॉर्मवर सही कोणाची होती याचा विसर पडला असून काहींना फारसे समजत नाही, उमजत नाही असा टोला विरोधकांना लगावत उद्याचा काळ हा आपल्या महाविकास आघाडीचाच असेल असा विश्वास रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांनी निजामपूर येथील सत्कार कार्यक्रमात बोलताना व्यक्त करीत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
माणगाव तालुक्यातील निजामपूर विभाग महाविकास आघाडी पुरस्कृत ग्रामपंचायत निवडणुकीतील भागाड, शिरवली, करंबेळी, कुंभे, होडगाव ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित विजयी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्यांचा जाहीर सत्कार व मतदार बंधू भगिनी यांचा जाहीर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम निजामपूर येथे श्रीकृष्ण राईस मिलच्या समोरील भव्य पटांगणात बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खा. सुनील तटकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत महाविकास आघाडी सरकारने आपल्या कारकिर्दीत केलेल्या विकासकामांचा तसेच लोकाभिमुख कामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर ठेवला. या कार्यक्रमास स्व. माजी आमदार माणिकराव जगताप यांचे सुपुत्र युवानेते श्रेयश जगताप, धनंजय जगताप, शिवसेना ठाकरे गटाचे माणगाव तालुका प्रमुख गजानन अधिकारी, काँग्रेसचे महाड विधानसभा अध्यक्ष जनार्दन मानकर, निजामपूर सरपंच राजाभाऊ रणपिसे, महाड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर, उपाध्यक्ष प्रसाद गुरव, शिवसेना माजी विभागप्रमुख अनिल मोरे, माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुभाष केकाणे, तालुका महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संगीता बक्कम, रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अनंता महाडिक, माणगाव पंचायत समिती माजी उपसभापती तुकाराम सुतार, तरुण मराठी उद्योजक सुभाषशेठ दळवी, माणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती बाळाराम दबडे, निजामपूर विभाग प्रमुख लक्ष्मण महाळुंगे, निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा देविका पाबेकर, शिवसेना महिला आघाडी प्रमुख शिवानी महामुणकर, मोर्बा विभाग राष्ट्रवादी अध्यक्ष शौकत रोहेकर, शिवसेना जेष्ठ नेते अशोक पाटील, बाबू कळंबे, उणेगाव सरपंच राजू शिर्के, चंद्रकांत पवार, जेष्ठ नेते राष्ट्रवादी भिकूशेठ धाडवे, निजामपूर शहर राष्ट्रवादी अध्यक्ष महेश शिर्के, निजामपूर विभाग राष्ट्रवादी सचिव किरण पागार, निजामपूर गण राष्ट्रवादी अध्यक्ष घनश्याम तटकरे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य, सदस्या, विभागातील सरपंच यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.तटकरे पुढे म्हणाले, दैदिप्यमान पाच विरुद्ध शून्य असा विजय नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यात निजामपूर विभागाने संपादन केला. राज्यात २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीला आपण सारेजण सामोरे गेलो. भाजप पुन्हा सत्तेवर आले होते. निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्रातील सुविध्य जनतेने महाविकास आघाडीलाही वेगळ्या प्रकारचा कौल दिला. पवार साहेब व उद्धवजींनी राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकत्रित येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही साथ दिली. त्यानंतर राज्यात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. बाळासाहेबांनी ५५ ते ६० वर्षांपूर्वी शिवसेना स्थापन केली. शिवसेनेने अनेकांना नगरसेवक, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार व मंत्री केले आहेत. मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री केले. तसेच नारायण राणे यांनाही शिवसेनेने मुख्यमंत्री केले हे कोणीच नाकारू शकत नाही. राज्यात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा तो क्षण होता. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यावर कोकणाला व रायगड जिल्ह्याला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने उद्धवजींच्या नेतृत्वाखाली अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. आघाडीची सत्ता स्थापन झाल्यावर कोरोनासारखा जीवघेणा संकट संबंध देशावर आला. यातून जनता सावरत असतानाच पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आला. चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी महाविकास आघाडी सरकारने नुकसानग्रस्तांना निकषाच्या बाहेर जाऊन तिप्पट पटीने मदत दिली. सर्व काही महाविकास आघाडीचे चांगल्या प्रकारे चालले होते. अशा वेळी काहींची खोड असते त्यांच्यात अगोदरच शिजलेले होते. उद्धव ठाकरेंनी आपल्या सहकाऱ्यांवर अधिकच विश्वास दाखविला होता. या लोकांनी पालकमंत्र्यांच्या विषय लावून धरीत त्यांना जे करायचे होते ते केले. आदिती पालकमंत्री असताना तिने कोरोना व निसर्ग चक्रीवादळात कशा प्रकारे काम केले आहे हे आपण सर्वांनी पहिले. रायगडात मेडिकल कॉलेज आणले. कोकण विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी आणली. अनेक लोकाभिमुख कामे करण्याचा अदितीने प्रयत्न केला. हे काहींना बघवले गेले नाही.
महाडचे माजी आमदार स्व.माणिकराव जगताप हे एक लढाऊ नेते होते.बकोरोना संकटकाळात त्यांनी चांगलेसे काम महाड तालुक्यात केले. शिवसेनेच्या तत्वाशी व निष्ठेशी काहींनी फारकत घेऊन गद्दारी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांनी गद्दारी आवडत नाही. माणगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकात विरोधकांनी आम्ही चांगले यश संपादन करू अशी दर्पोक्ती निर्माण केली होती .पण तालुक्यातील सुज्ञ जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देत महाविकास आघाडीने भक्कमपणाने १९ पैकी १८ ग्रामपंचायतीवर आघाडीचा झेंडा फडकविला. येणाऱ्या सर्वच निवडणुका आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवून जिंकायचे असून गद्दरांना त्यांची जागा दाखवून द्यायची असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी उपसभापती तुकाराम सुतार, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, युवानेते श्रेयश जगताप, शिवसेना माजी विभागप्रमुख अनिल मोरे, कुंभे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच महेश कोंडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.


0 टिप्पण्या