ताम्हिणी घाटामध्ये ट्रकचा अपघात
पोलीस प्रवाह न्यूज
माणगांव-दि. १२- माणगांव तालुक्यातील ताम्हिणी घाटात ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ४.१५ वा. च्या सुमारास ताम्हिणी घाटातील मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत माणगांव पुणे रोडवर ट्रक गाडी क्र. एम एच १२ एल टी ४५९९ वरील चालक उमेश संदिप भाकरे, वय २५ वर्ष, रा. यवत, ता. दौंड, जि. पुणे याने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून वळणावर अपघात केला. ट्रक झाडावर आदळल्याने दरीत कोसळला नाही.
या अपघाताची माहिती मिळताच माणगांव पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. कुवेस्कर, पो. ना. जाधव, खिरीट, पो. शि. तलवारे, पाटील, माटे व सोबत साळुंखे रेस्क्यू टीमचे इम्रान ढवलारकर, रविंद मोरे, रफि जामदार, हृषीकेश मोरे, शाहरुख अफवारे, सुमित साळवी, शुभम बुरटे, मुजाहिद शेख. तसेच या वेळी रुग्णवाहिका घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक केबिनमध्ये ३ जण अडकले असल्याने. ते मदतीसाठी टाहो फोडत होते. ट्रक पूर्ण सामानाने भरलेल्या असून एकदम कोपऱ्यावर अडकल्याने मदतकार्य करण्यास अडथळा येत होता. थोडी जरी चुकी झाली तरी ट्रक केबिनमध्ये अडकलेल्या तिघांचा जीव जाऊ शकत होता. त्यावेळी मोठ्या मेहनतीने माणगांव पोलीस व साळुंखे रेस्क्यू टीमने त्या तिघांना ही सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे पाठविले. तिघांची प्रकृती आता स्थिर असून अपघाताचा पुढील तपास पो. ना. खिरीट करीत आहेत.




0 टिप्पण्या