म्हसळा तालुक्यात पाच कोटींचा कृषीप्रकल्प उभारणार -निलेश थोरे
म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी ली. च्या कार्यालयाचे जल्लोषात उदघाटन
पोलीस प्रवाह न्यूज
म्हसळा- दि. १९- म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांना मुख्य प्रवाहात आणून ग्लोबल मार्केटचे दार उघडून देण्यासाठी म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी ली. ची स्थापना करण्यात आली. कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन नाबार्डचे नोडल ऑफिसर प्रदीप अपसुंदे यांच्या शुभहस्ते व उप जिल्हाधिकारी सतीश बोऱ्हाडे व महाएफपीसी चे प्रकल्प व्यवस्थापक अक्षय गांगर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शेतकरी व कंपनीचे भागधारक यांच्या साक्षीने पार पडले.
याप्रसंगी पारंपारिक पद्धतीने बैलपूजन करण्यात आले. तर तालुक्यातील आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. म्हसळा तालुक्यात कंपनीच्या माध्यमातून कृषीक्षेत्रामध्ये येत्या आर्थिक वर्षात तब्बल पाच कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची घोषणा निलेश थोरे यांनी केली. ज्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून कृषी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधीदेखील तरुणांना उपलब्ध होणार आहेत. कंपनीच्या माध्यमातून भात खरेदी केंद्र व थेट शेतकरी ते ग्राहक तत्वानुसार कांदा विक्री केंद्राचे उदघाट्न करण्यात आले असून त्यामुळे म्हसळा तालुक्यातील शेतकऱ्यांना भात विक्री करीता यापुढे माणगाव, रोहा, इंदापूर येथे न जाता तालुक्यामध्येच आपला भात विक्री करता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतिरिक्त श्रम, वेळ व वाहतूक खर्चाची देखील बचत होणार आहे.
म्हसळा तालुक्यातील उत्पादीत होणाऱ्या सर्वच शेतमालाची म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दराने थेट बांधावरूनच खरेदी करण्यात येणार असून शेतमालावर प्रक्रिया करून जास्तीत जास्त परतावा शेतकऱ्यांना कसा देता येईल ह्या दृष्टिकोनातून परदेशातील शेतीतंत्र व कृषीतज्ञांच्या मदतीने म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी प्रयत्नशील राहणार आहे. नाबार्ड चे नोडल ऑफिसर प्रदीप अपसुंदे यांनी कंपनीच्या सर्व संचालक मंडळाचे विशेष कौतुक करून लवकरच म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी ही राज्यातील प्रमुख उत्पादक कंपन्यांच्या यादीत कशी आणता येईल याकरिता नाबार्ड तर्फे सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन कंपनीला करणार असल्याचे सांगितले तर प्रमुख पाहुणे सतीश बोऱ्हाडे यांनी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाची माहिती देतानाच कंपनीच्या पाच कोटीच्या स्मार्ट प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देणार असल्याचे सांगून तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कंपनीच्या माध्यमातून आपले हित साधून घेण्याचे आवाहन त्यानी केले. जिल्हा बँकेचे शाखाधिकारी यांनी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा व योजना याबद्दल सविस्तर माहिती देतानाच जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव म्हसळा तालुका फार्मर प्रोड्यूसर कंपनी ली. च्या पाठीशी ठाम राहणार असल्याची खात्री दिली.
यावेळी कंपनीचे संचालक गौरी पयेर, संचालक मनोहर तांबे, संचालक पांडुरंग मेंदाडकर, संचालक निलेश थोरे, चेयरमन निलेश मांदाडकर, जिल्हा समन्वयक महेश खांडेकर, धनराज गायकवाड, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी मुंढे व शेतकरी बांधव भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.




0 टिप्पण्या