माणगावांत आढळला विचित्र जीव!

 माणगावांत आढळला विचित्र जीव!

पोलीस प्रवाह न्यूज 

माणगाव-दि. ७- आपल्या पैकी आजवर कुणीही पाहिला नसेल असा माणगांवच्या उतेखोल येथिल वाकडाई मंदिराकडे जाणाऱ्या निवांत रस्त्यावर आढळला एक विचित्र जीव. सकाळचे वेळी ग्रामदैवत देवी वाकडाई दर्शनासाठी गेलेले स्वीकृत नगरसेवक हेमंत(बंड्या) शेट हे आपल्या दूचाकी वरुन जात असताना त्यांचे गाडी समोर एक ताडगोळ्याच्या आकाराचा कासवा समान दिसणारा जीव रस्त्यालगतच्या जंगल परिसरात रेंगाळताना दिसला. वरुन जांभळट मातकट लालसर रंगाचा हा जिव पहाताच त्यांना कुतुहल वाटले, भितीही वाटली कधिही न पाहिलेला हा जीव कासवासारखा सरकत होता. त्याच्या जवळ जाताच त्यांने आपले डोके, पाय शरिराच्या आतील भागात लपवले. आपले वहान थांबवुन हे काय हे पहाण्यासाठी त्यांनी जवळ जाऊन निरखुन पाहीले असता हा जिव आणखी वेगाने सरकु लागला. जवळची एक काडी उचलुन तिच्या सहाय्याने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला व लागलीच येथील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर याला फोन करून याची माहिती सांगितली.

शंतनुही तात्काळ तिकडे निघाला तोपर्यंत तो पळुन जावु नये म्हणुन जवळ पडलेली एक प्लास्टिकची पिशवी घेऊन तिचे तोंड या प्राण्याच्या दिशेला धरले असता तो या पिशवीत शिरला. त्याला उचलून हेमंत शेठ हे शंतनुच्या घरी आले. पिशवी उघडून पाहताच हे कासव नसून आत मध्ये दूर्मिळ बेडूक वाटत असल्याचे शंतनुने त्यांना सांगितले. त्याची माहिती मिळवली, एखाद्या फुग्या प्रमाणे तो आपले शरीर फुगवतो म्हणून त्याला बलुन फ्रॉग, फुग्यासारखा बेडुक म्हणून ओळखले जाते अशी माहिती शंतनुने दिली आहे. याला पाहताच "बेडका सारखा फुगु नकोसं नाहीतर फुटशील!" या म्हणीची आठवण व्हावी असा जीव पाहुन अनेकांनी कुतुहल व्यक्त केले आहे.



कासवा प्रमाणे डोके छोटे चार पाय व कासवाप्रमाणेच तोंड लपविण्याची कला यामध्ये दिसुन येत असुन एखाद्या सुमो पेहलवानासारखादेखील तो दिसतो याला शंतनुने उतेखोल परिसरात सुरक्षित सोडुन दिले आहे. बेडुक प्रजाती मध्ये वेगवेगळ्या आकाराचे बेडुक पहायला मिळतात यामध्ये चांद किंवा चामटी बेडकी गावाकडील घरांमध्ये भिंतीवरही पटकन उडी मारुन बसते. जवळ जाताच आपले संरक्षण करण्यासाठी आपले अंगावर पाणी सदृश द्रव(लघवी) उडवुन आपली सुटका करुन घेणारी बेडकी आपण पाहतो. तसेच पावसाळ्याचे सुरुवातीला डरावं डरावं आपले गालजवळील फुगा फुगवुन ओरडणारे बेडुक आपण पहातो. पण असा हा बेडूक क्वचितच नजरेस पडत असल्याचे येथिल ग्रामस्थांनी सांगितले आजवर असा बेडुक मात्र पाहिला नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

हा बेडूक मुख्यतः जमीन पोखरून राहत असल्यामुळे सहसा माणसाच्या नजरेस पडत नाही व जमिनीखाली जवळपास वर्षभर काहीही न खाता-पिता जिवंत राहू शकतो, पावसाळ्याच्या सुरुवातीला  प्रजनन काळातच हे बेडूक दिसून येतात आणि जमिनीत राहत असले तरी ते पाण्यातही तरबेजपणे पोहोतात, त्यांचे मुख्य अन्न मुंग्या आणि वाळवी असल्याची माहिती शंतनु कुवेसकर यांनी दिली आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या