किल्ले रायगड परिसरात शेतकऱ्यांना सौरदिव्यांची भेट
माणगाव-दि. २० मुंबई येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. उदय अंदार यांच्या परिज्ञान परिवार संस्थेतर्फे संस्थेचे स्वयंसेवक अजय नाडकर्णी व त्यांच्या पत्नी नेहा नाडकर्णी यांच्या प्रयत्नांतून माणगांव तालुक्यातील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्या मार्फत किल्ले रायगड परिसरात खेड्यांमध्ये शेतकरी कुटुंबांना सौरऊर्जित दिव्यांची भेट देण्यात आली आहे. या आधी २०२० साली निसर्ग चक्रीवादळानंतर व दिवाळीनिमित्त माणगांव तालुक्यात या सौरऊर्जित दिव्यांची भेट देण्यात आली होती.
अजय नाडकर्णी यांची ५ वर्षाची कन्या अनन्या नाडकर्णी हिच्या हस्ते किल्ले रायगड परिसरातील दुर्गम खेड्यात जाऊन तेथील शेतकरी वर्गातील जेष्ठ नागरिकांस सौर उर्जेवर चालणाऱ्या दीव्यांचे वाटप केले गेले. शहरी जीवन जगणाऱ्या लहानग्या अनन्याने यासोबतच शेतांमध्ये सुरु असलेल्या मळणीचा आनंद घेतला. आपल्याला सहजी उपलब्ध होण्याऱ्या धान्यासाठी शेतात शेतकरी कशा प्रकारे व किती मोठ्या प्रमाणात मेहनत घेत असतात याचा अनुभव यातून मिळाल्याचे नाडकर्णी यांनी सांगितले.
परिज्ञान परिवार संस्थेने निसर्ग चक्रीवादळापासून रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सौरऊर्जित दिव्यांचे वाटप केले असून लोकांपर्यंत मोफत ऊर्जा पोहोचवून सौरऊर्जेचे महत्व अधोरेखित करून दिले आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी दोन ते तीन महिने वीज खंडित होती त्या काळात ह्या सौरऊर्जित दिव्यांचा येथे अनेकांना आधार मिळाला होता. दैनंदिन जीवनात शेतकरी कुटुंबांना ह्या सौरऊर्जित दिव्यांचा चांगल्या प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागात रात्रीच्या काळोखात वाड्यावस्तीतून पायी चालताना या दिव्यांचा खुपच उपयोग होतो तसेच सौर उर्जेचे हे दिवे अगदी सर्व साधारण प्रकाशात देखिल चार्जिंग होतात व वापरण्यास अत्यंत सोपे आहेत. अधुन मधून खंडित होणारी वीज अशा वेळी पटकन लावता येतात तसे जवळपास सहा ते आठ तास व्यवस्थित प्रकाश देतात. प्रकाशमान सौरदिवे भेट मिळाल्याने दुर्गम ग्रामीण भागातील जेष्ठ शेतकरी ग्रामस्थांचे चेहरे समाधानाने उजळले.
परिज्ञान परिवार संस्था २००७ साली लोणावळ्यामधील कार्ला येथील स्वामी परिज्ञानाश्रम यांच्या स्मरणार्थ लोकसेवेसाठी स्थापन करण्यात आली असून संस्थेमार्फत अनेकांना वैद्यकीय मदत देखील पुरवली जाते, सध्या संस्थेमार्फत लोणावळ्यात दहिवली, कार्ला येथे वृद्धाश्रम देखील स्थापित करण्यात येत आहे.



0 टिप्पण्या