कोल्हापूर-बाचणी गावच्या भुषण लाड यांना प्राईड ऑफ स्पंदन पूरस्कार प्रदान...
सिक्कीमचे माजी राज्यपाल व लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते कराड येथे सन्मान.
प्रतिनिधी -विवेक पोतदार.
ओठावर मिशा आल्या नाहीत तोपर्यंत काही युवक मोबाईल आणि व्यसनाच्या आहारी गेलेली पहायला मिळत आहेत. सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे आज अनेक युवक चुकीच्या मार्गाने गेल्याचे अनेक वेळा पाहायला मिळत आहे. समाजातील या बदलामुळे जुनी जाणती माणसे, सामाजिक बांधिलकी जपणारी माणसे चिंतेत आहेत. पण बाचणी गावचा एक युवक मात्र या सर्व गोष्टींना अपवाद आहे. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो, या जाणिवेतून हा युवक स्वखर्चाने समाजातील बेघर, बेवारस, मनोरुग्ण लोकांचे पुनर्वसन करतो आहे. मागील १२-१३ वर्षात तब्बल ६४ लोकांचे पुनर्वसन करण्यात तो यशस्वी झालाय.
या युवकाचं नाव आहे भुषण लाड. त्याच्या या अनमोल कार्याची दखल घेऊन कराड, जि. सातारा येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा 'प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार' देऊन त्याचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सिक्कीम चे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते, शिवव्याख्याते अरुण घोडके, अभिनेते रवी साळुंखे, अभिनेत्री सुनंदा शेंडे, अभिनेत्री राजश्री परुळेकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. आता पर्यंत २४ राज्यस्तरीय आणि ३ राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.
वयाच्या १६-१७ व्या वर्षी पासून म्हणजेच कॉलेज जीवनातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. बेघर, बेवारस, मनोरुग्ण लोकांचे पुनर्वसन करत असताना समाजातील अनेक मदतीचे हात त्यांच्या सोबत सहभागी झाले. यामध्ये अनेक युवक, युवती, डॉक्टर, वकील, शिक्षक असे प्रत्येक क्षेत्रातील सदस्य सहभागी झाले. या सर्वांनी मिळून "उडान फौंडेशन" या सामाजिक सेवाभावी संस्थेची सुरुवात केली. बघता बघता त्यांच्या कामाची व्याप्ती इतकी वाढली, की उडान फौंडेशन आज १४ जिल्ह्यात सामाजिक कार्य करत आहे...
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू संस्था, कुटुंब यांना अन्नधान्य, कपडे वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, अन्नदान, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत, अनेक रुग्णांना आर्थिक मदत, महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत या हेतूने महिलांच्यासाठी मोफत लघु उद्योग प्रशिक्षण, व्यसनमुक्ती असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. निराधार लोकांचे पुनर्वसन तसेच गरजू रुग्णांच्यासाठी उडान फौंडेशनकडून अँब्युलन्ससाठी लोकसहभागातून निधी उभा करण्यात येत आहे. आता पर्यंत एक लाख रुपये जमले आहेत, ही त्यांच्या कार्याची असलेली पोहोचपावतीच म्हणावी लागेल.
अगदी कमी वयात भुषण लाड करत असलेल्या सामाजिक कार्याचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. तसेच आज मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा पुरस्कार उडान फौंडेशनचे सदस्य, उर्वी वुमन्स क्लबच्या अध्यक्षा सारिका पाटील आणि सदस्य या सर्वांनी मिळून स्वीकारला..


0 टिप्पण्या