वृक्षप्रसादातून पर्यावरण संवर्धन संकल्पना प्रभावी राबवूया-सयाजी शिंदे

वृक्षप्रसादातून पर्यावरण संवर्धन संकल्पना प्रभावी राबवूया - सयाजी शिंदे

पोलीस प्रवाह न्युज

कोल्हापूर दि.३०- पर्यावरण संवर्धन काळाची गरज बनली असून, प्रत्येक देवस्थानच्या माध्यमातून भाविकांना देशी झाडे प्रसादाच्या माध्यमातून देणे महत्त्वाचे ठरेल. ही संकल्पना प्रभावी राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत सह्याद्री देवराईचे संस्थापक अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडी उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सह्याद्री देवराईच्या वतीने करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात गुरुवारी दिमाखात वृक्षप्रसाद योजनेस प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अंबाबाई देवीचे फळ म्हाळुंग तसेच आंबा, बेल, ताम्हीण, आपटा यांसह इतर देशी झांडांचे वितरण अभिषेक  करणार्‍या भाविकांना देण्यात करण्यात येणार आहे. यावेळी सयाजी शिंदे यांनी पुजार्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी सयाजी शिंदे म्हणाले, नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून भाविकांना वृक्षप्रसाद मिळणार आहे. हा उपक्रम नित्य सुरू राहणार आहे. हे झाड जे वाढवतील, त्यांना नक्कीच आशीर्वाद मिळेल. हा उपक्रम सर्वांनी स्वीकारून झाडे वाढवावीत. त्याचा निश्चितच पर्यावरणास मोठा हातभार लागणार आहे.

नाईकवडी म्हणाले, आई अंबाबाईचे आवडते फळ म्हाळुंग आहे. या फळाचे आयुर्वेदिक महत्त्व आहे. या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे काम होणार आहे. हा उपक्रम नित्य सुरू राहणार आहे. जोतिबा डोंगरावरही सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपण करून डोंगर वाचवला जाणार आहे.

यावेळी उत्तम जाधव, प्रशांत साळुंखे, मोहन खोत, चंद्रकांत लोहार, देवीचंद ओसवाल, महेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या