भ्रम पसरवण्याच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आव्हानात्मक - बी एम हिर्डेकर* *अंनिसच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे यांची, जिल्हा प्रधान सचिव पदी रेश्मा खाडे, प्रा. शिवाप्पा पाटील आणि सचिन सुतार यांची तर विविध उपक्रम कार्यवाहपदी संघसेन जगतकर यांची निवड.



 भ्रम पसरवण्याच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आव्हानात्मक - बी एम हिर्डेकर

*अंनिसच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे यांची, जिल्हा प्रधान सचिव पदी रेश्मा खाडे, प्रा. शिवाप्पा पाटील आणि सचिन सुतार यांची तर विविध उपक्रम कार्यवाहपदी संघसेन जगतकर यांची निवड*



कोल्हापूर - समाजात सर्वत्र भ्रम पसरवले जात असताना अशा काळात अंधश्रद्धा निर्मूलन आणि विवेकवाद रुजविण्याचे काम आव्हानात्मक आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे आव्हान यशस्वीरित्या पेलत आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग प्रमुख बी एम हिर्डेकर यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कोल्हापूर जिल्हा प्रेरणा मेळावा काल बिंदू चौकातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात संपन्न झाला यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 

या प्रेरणा मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी केले उद्घाटन प्रसंगी बोलताना सुरेश शिपूरकर म्हणाले, "आम्ही साठ वर्षांपूर्वी काम करताना जी आव्हाने होती ती अजूनही संपलेली नाहीत उलट गेल्या काही वर्षात देशातील बदललेली राजकीय सामाजिक परिस्थिती यामुळे हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणे अधिक कठीण बनले आहे. बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कामात तरुणाईचा सहभाग अधिक वाढवला हे कौतुकास्पद आहे." नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारणी निवड प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णात स्वाती यांची राज्य सरचिटणीस म्हणून प्रा डॉ अरुण शिंदे यांची अंधश्रद्धानिर्मूलन पत्रिकेच्या संपादक मंडळात हर्षल जाधव यांची जोडीदाराची विवेकी निवड विभागाचे राज्य कार्यवाह तर रामदास देसाई यांची विविध उपक्रम विभाग राज्य सहकार्यवाह पदी निवड झाल्याबद्दल सुरेश शिपूरकर यांचे हस्ते त्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या जून महिन्याच्या शाहू जयंती विशेषांकाचे प्रकाशन ही सुरेश शिपूरकर यांचे हस्ते करण्यात आले.

या जिल्हा प्रेरणा मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 13 शाखांमधून झालेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच पुढील चार महिन्यांच्या कामाचे नियोजनही करण्यात आले. सध्या जिल्ह्याच्या पदांवर काम करणारे कार्यकर्त्यांची राज्य कार्यकारिणीत निवड झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली. यामध्ये करवीर शाखेचे दिलीप कांबळे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, राधानगरी शाखेच्या रेश्मा खाडे, शाहुवाडी शाखेचे प्रा. शिवाप्पा पाटील आणि मुरगुड शाखेचे सचिन सुतार यांची जिल्हा प्रधान सचिव पदी तर कोल्हापूर शहर शाखेचे संघसेन जगतकर यांची विविध उपक्रम कार्यवाहपदी निवड करण्यात आली. 

यावेळी भास्कर सुतार आणि संघसेन जगतकर यांनी कार्यकर्त्यांना चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांसह सादरीकरण कसे करायचे याचे प्रशिक्षणही दिले.

मेळाव्याच्या समारोप प्रसंगी चे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा विभाग प्रमुख प्रा डॉ बी एम हिर्डेकर, निरीक्षक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे तर अध्यक्षपदी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना हिर्डेकर यांनी आज अगदी उच्चशिक्षित लोक सुद्धा अंधश्रद्धा पाळताना दिसत आहेत या विषयी खेद व्यक्त करून सामान्य लोकांपेक्षा विज्ञानाची सृष्टी घेऊनसुद्धा अज्ञानाचीच दृष्टी बाळगणाऱ्याया उच्चशिक्षित लोकांच्या अंधश्रद्धा दूर करणे खूप कठीण आहे असे नमूद केले. संजय बनसोडे यांनी बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीचा आढावा घेत सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि भविष्यात राज्याला मार्गदर्शक ठरेल असे काम कोल्हापूर जिल्ह्यातून होईल अशी आशा व्यक्त केली. अध्यक्षपदावरून बोलताना नुतन जिल्हा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून कॉ. सतीशचंद्र कांबळे म्हणाले, "भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेहमीच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचा पाठीराखा राहिला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रत्येक लढाईमध्ये आम्ही कृतिशील भागीदार राहिलो आहोत." सर्वच सामाजिक चळवळींच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रबोधन याबरोबरच राजकीय भान येणे देखील आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

या प्रेरणा मेळाव्यासाठी सारिका पाटील, स्मिता कांबळे, मनीषा पाडळकर, यशवंती शिंदे, स्वाती कृष्णात, मुक्ता निशांत, प्रमोद शिंदे, प्रा. प्रकाश नाईक, समीर कटके, कृष्णा कांबळे, शंकर कांबळे, परशराम प्रधान, नानाजी सूर्यवंशी, कपिल मुळे, शरद पाडळकर, बी के कांबळे, भास्कर सुतार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील 11 शाखांमधून 46 कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी केले. स्वागत निशांत सुनंदा विश्वास यांनी सूत्रसंचालन हरी आवळे आणि आकांक्षा कांबळे यांनी केले. तर आभार भीमराव कांबळे यांनी मानले. शेवटी सरदार काळे यांनी अंनिसचा निर्धार वाचून दाखवला आणि होंगे कामयाब हे गीत गाऊन मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

 यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे शाहू जयंती विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित डावीकडून हर्षद जाधव, कृष्णात स्वाती, अरुण शिंदे, दिलीप कांबळे, आणि रेश्मा खाडे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या