गाड्यावरील फळविक्रेता ते सनदी अधिकारी ...सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेचे यूपीएससी (UPSC ) परीक्षेत यश


गाड्यावरील फळविक्रेता ते सनदी अधिकारी ...

सिद्धनेर्लीच्या स्वप्निल मानेचे यूपीएससी (UPSC ) परीक्षेत यश ..


सिद्धनेर्ली ता . कागल जि.कोल्हापुरचे सुपुत्र स्वप्निल तुकाराम माने यांनी यंदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा UPSC  परीक्षेत देशात ५७८ वा क्रमांक पटकावला आहे.

 आज दुपारीच जाहीर झालेल्या या निकालात अतिशय खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी हे यश मिळवले आहे. स्वप्निल याचं प्राथमिक शिक्षण प्राथमिक विद्या मंदिर भागशाळा नदीकिनारा येथे झाले तर माध्यमिक शिक्षण सिद्धनेर्ली विद्यालय सिद्धनेर्ली येथे झाले.इयत्ता १० मध्ये ८४.७३ % गुण मिळवूनही परिस्थितीमुळे त्यांना आयसीआरई (ICRE ) गारगोटी येथे यांत्रिक अभियांत्रिकी  (मेकॅनिकल डिप्लोमा ) साठी प्रवेश घ्यावा लागला.

लहानपणीच आईच निधन झाल्याने परिस्थितीमुळे घराजवळ असणाऱ्या इक्बाल चाचा यांच्या फळाच्या गाडीवर काही काळ मदतनीस म्हणून काम केले. डिप्लोमा मध्ये ८७.९४ गुण मिळवूनही पुढील शिक्षण घेण्याच्या अशा धूसर झालेल्या असताना महाराष्ट्र टाईम्स च्या ‘ त्याच्या शिक्षणाच काय ’ या बातमीमुळे त्याला काही लोकांनी शिक्षणासाठी मदत केल्याने विश्वकर्मा इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी  (VIT), पुणे या नामांकित शिक्षण संस्थेत बी.ई मेकॅनिकल साठी प्रवेश मिळवला.त्यामध्ये १० पैकी ९.३ क्रेडीट मिळवून २०१८ मध्ये तेथेही अव्वल स्थान मिळविले. त्यानंतर पूर्णवेळ स्पर्धा परीक्षांची तयारी पुणे येथे सुरु केली.

पहिल्या दोन प्रयत्नात पूर्व परीक्षेत अपयश आल्याने खचून न जाता पुन्हा तयारी चालू ठेवली .दरम्यान वडिलांचं गावी अपघाती निधन झाल्याने  त्याला काही काळ गावी परतावं लागले.कोरोना काळात गावी राहून पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करून दोन्ही परीक्षेत पात्र होवून मे २०२१ मध्ये मुलाखत झाली. 

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये स्वप्निल माने यांनी मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. इयत्ता ४ थी मध्ये आईचा व २०१८ मध्ये वडील या दोघांच्या मृत्यूने खचून न जाता घरामध्ये दोन लहान बहिणी, आज्जी आजोबा, पणजी यांचा सांभाळ करत अभ्यासाचा डौलारा सांभाळत परिस्थितीचा बाऊ न करता मिळवलेले हे यश नक्कीच लाखात एक आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून होवूनही स्वप्निल माने यांनी UPSC परीक्षेसाठी पेपर लिहिण्यासाठी तसेच मुलाखतीसाठी माध्यम म्हणून इंग्रजी भाषेची निवड केली होती. त्यामुळे मराठी माध्यमातील मुले मागे पडतात हा समज स्वप्निल माने यांच्या यशाने खोटा ठरवला आहे.

त्याला डॉ.दिगंबर प्रधान (आयपीएस), रवींद्र काटकर , एकनाथ पाटील सर्व पुणे तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघरचे नीलेश सांबरे,  शशांक ठाकरे वाडा जि. पालघर ,उमेश मगदूम (वित्त व लेखाधिकारी, रत्नागिरी) तसेच स्वामी विवेकानंद अभ्यासिका यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या