५ लाख रुपये न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. २९ - माणगांव शहरात हॉटेल व बार मध्ये जाऊन महिलांना सोबत घेऊन,कधी पोलीस असल्याची बतावणी करत तर कधी पत्रकार असल्याचे सांगत हॉटेल वा बार मधील इतर ग्राहक व हॉटेल व्यावसायिक यांना ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे अश्याप्रकारची टोळी माणगाव मध्ये अस्तिवात असल्याचे स्पष्ट होत आहे. असाच एक प्रकार माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई गोवा महार्गावरील एका हॉटेल मध्ये फोटो व्हिडिओ काढून फिर्यादी यांना पोलीस असल्याचे ची धमकी देऊन पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार २४ एप्रिल २०२२ रोजी घडला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,या घटनेत आरोपी किशोर मुरकर ,सौरभ दादा ,इस्माईल व २ स्त्रियांचा समावेश आहे. घटना अशी की,२४ एप्रिल २०२२ रोजी माणगाव मधील मुंबई गोवा हायवेवरील हॉटेल रॉयल पॅलेस च्या लॉजिंग च्या रूम मध्ये तांबट आळी महाड येथील राहणारे फिर्यादी व घटनेतील आरोपीत क्र ५ यांना एकत्र आणून फोटो व व्हिडीओ काढून फिर्यादी यांना घटनेतील ५ आरोपींनी ५ लाख रुपये दे नायतर फोटो व व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांना मारहाण करून जबरदस्तीने गाडीत भरून इंदापूर बाजूकडे घेऊन गेले.व मागणी केलेल्या ५ लाखापैकी २१००० रु गुगल पे ने ट्रान्सफर करून घेतले. तसेच फिर्यादी यांना वारंवार फोन करून पैशाची मागणी केली व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे कॉ गु रजि नं १४८/२०२२ ,भा दं वि स कलम ३६४(अ),१२० (ब),१७०,३२३,५०६, ३४ प्रमाणे २९ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अस्मिता पाटील ह्या करीत आहेत.



0 टिप्पण्या