अवजड वाहतूक सेनेचे माणगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उतेकर यांना बेस्ट सोशल अवाॅर्ड 2022 पुरस्कार प्रदान
पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि. २८ - माणगाव तालुक्यातील विळे भागाड औद्योगिक वसाहतीमध्ये तासगाव आणि परिसरात गेली अनेक वर्षे नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचे व्रत स्वीकारलेल्या ज्ञानेश्वर उतेकर यांना एम्पाॅवर सोशल अॅन्ड एज्युकेशनल ट्रस्ट आणि अमेरिकन विद्यापीठ ( युएसए) तर्फे बेस्ट सोशल अवाॅर्ड 2022 प्रदान करून गौरव केला आहे.
निजामपूर आणि विळे भागाड परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सतत आरोग्य शिबिरे राबवून शिवसेना अवजड उद्योग सेनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उतेकर यांनी गेली अनेक वर्षे समाजकार्यात अग्रेसर राहिले आहेत.माणगाव तालुक्यातील अनेक आदिवासीपाड्यांमध्ये त्यांनी रक्तगट तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत. कोरोनासारख्या भयंकर संकटातही अपोलो हाॅस्पिटल ट्रस्टच्या माध्यमातून निजामपूर शहरात रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तसंकलनाचे महत्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्रभर रक्ताचा तुटवडा असताना , त्यांनी केलेले हे मानवी कल्याणाचे कार्य बघून , एम्पाॅवर सोशल अॅन्ड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
समाजसेवक ज्ञानेश्वर उतेकर यांच्या कार्याची दखल संस्थेने घेतली असून , मुंबईतील ताज रेसिडन्सी येथील एका मोठ्या समारंभात अमेरिका विद्यापीठाचे डाॅ. घनश्याम कोळंबे यांच्या हस्ते बेस्ट सोशल अवाॅर्डचे सन्मानचिन्ह उतेकर यांना देण्यात आले.याप्रसंगी श्रीसिध्दीविनायक ट्रस्टचे पदाधिकारी, हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती होती. या महत्वपूर्ण पुरस्काराबद्दल ज्ञानेश्वर उतेकर यांचे निजामपूर विभागात सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.



0 टिप्पण्या