माणगांव नगर पंचायतमध्ये शेकापचा शिवसेनेला पाठिंबा
पोलीस प्रवाह न्यूज
रायगड: दि. ५ - माणगांव नगर पंचायत निवडणूकित माणगांव विकास आघाडीने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी माणगांवात घडल्या. माणगांव विकास आघाडीकडून ज्ञानेदेव पोवार व प्रशांत साबळे यांनी नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरताच ज्ञानदेव पोवार यांनी ना. सुभाष देसाई, ऍड. राजीव साबळे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकापचे मा. आ. पंडितशेठ पाटील यांनी ज्ञानदेव पोवार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आता माणगांवचा कारभार सुतारवाडीतून नव्हे तर आता माणगावमधूनच चालणार असून माणगांव नगर पंचायतीत शेकापचा शिवसेनाला पाठींबा असल्याचे मा. आ. पंडितशेठ पाटील यांनी जाहिर केले. यावेळी शिवसेना नेते ऍड. राजीव साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, शेकाप जेष्ठ नेते अस्लम राऊत, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, माणगांव विकास आघाडीचे सर्व नगरसेवक आदी शिवसेना, शेकाप कार्यकर्ते उपस्थित होते.
शेकाप शिवसेना पाठिंब्याबाबत शेकाप नगरसेविका ममता थोरे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
यावेळी पंडितशेठ पाटील म्हणाले की, रायगड जिल्ह्यात स्वर्गीय अशेकदादा साबळे यांच मोठं योगदान आहे. माणगांव विकास आघाडीने सत्ताधारी यांच्या विरुद्ध जनादेश मिळवला आहे. महाराष्ट्र राज्यात माणगांव हे अशोकदादा साबळे यांच्या नावाने ओळखले जाते. शिवसेनेचे ज्ञानदेव पोवार हे नगराध्यक्ष होणार असल्यामुळे आता गरिबांना त्रास होणार नाही. शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. शेतकरी कामगार पक्ष ज्याला पाठिंबा देतो. तोच आमदार, खासदार होतो. एक चांगल योगदान ज्ञानदेव पोवार यांच्या रूपाने माणगांवकरांना मिळाले आहे. फक्त पैशाने लोकांची मने जिंकता येत नाहीत. हे ऍड. राजीव साबळे यांनी माणगांव नगर पंचायत निवडणुकीत दाखवून दिलेले आहे. माणगांवमध्ये लोकशाहीचा विजय झालेला आहे. कै. प्रभाकर पाटील, अशोक साबळे यांचे रायगड जिल्ह्यात मोठे योगदान आहे.
नगर पंचायतमध्ये शेकापने शिवसेनेला दिलेल्या पाठींब्यामुळे आगामी काळात दक्षिण रायगड जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटणार असून जनतेच्या मनातील आघाडी येणाऱ्या निवडणुकीत पहावयास मिळणार आहे.

0 टिप्पण्या