रायगड: दि. ४ - माणगांव नगर पंचायतीवर शिवसेना पुरस्कृत माणगांव विकास आघाडीने १७ पैकी ९ जागांवर विजय मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि तटकरेंच्या साम्राज्याला मोठा हादरा दिला. या विजयाचे शिल्पकार आ. भरत गोगावले, माजी शिक्षण सभापती ऍड. राजीव साबळे आणि ज्ञानदेव पोवार हे ठरले. गेल्या १५ दिवसात माणगांवमध्ये नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. तसेच प्रचंड राजकीय दबाव राष्ट्रवादी पक्षाने आणला होता. परंतु, राजकीय दबावाला बळी न पडता माणगांव विकास आघाडी तर्फे ज्ञानदेव पोवार आणि प्रशांत साबळे यांनी आपले नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. खा. तटकरे यांनी विविध राजकीय क्लुप्त्या वापरण्याचा प्रयत्न करून पाहिल्या. परंतु, स्वर्गीय माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या मुशीत वाढलेले आणि त्यांचे सुपुत्र उगवते तरुण नेतृत्व शिवसेनेचे राजीव साबळे यांनी त्यांच्या दबावाला बळी न पडता तसेच आपले सर्व राजकीय वजन वापरून नगराध्यक्ष पदासाठी ज्ञानदेव पोवार यांचे नाव सुचविले. त्यानंतर ज्ञानदेव पोवार यांनी ना. सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
या निवडणुकीत माणगांव विकास आघाडीने वचननामा प्रसिद्ध केला होता. त्यांची पूर्तता करण्यासाठी ना. सुभाष देसाई यांनी प्रयत्न करावेत. तसेच विविध विकास योजना आणून माणगांवचा विकास साधणार आहोत. शिवसेनेचे आता ९ सदस्य आहेत. पाच वर्षानंतर ९ चे १७ होतील. अशी विकासकामे करून जनतेचा विश्वास संपादन करू. असे ऍड. राजीव साबळे यांनी सांगितले. यापूर्वी काही काळ या नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. मात्र पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आली. आता मात्र पूर्णपणे शिवसेनेची सत्ता आल्याने विकासाची गंगा वाहणार आहे. माणगांव हे आदर्श नगर करण्यासाठी शिवसेना नेहमीच कटिबद्ध राहील. सर्व नगरसेवकांनी असे काम करा की, जनतेनीच तुम्हाला पुन्हा निवडून दिले पाहिजे. राज्यात शिवसेनेची सत्ता असताना काहीही कमी पडू दिले जाणार नाही. यासाठी मी वैयक्तिक प्रयन्त करणार आहे असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून ज्ञानदेव पोवार आणि प्रशांत साबळे तर राष्ट्रवादीकडून आनंद यादव व रिया उभारे यांचे अर्ज दाखल झालेले आहेत. असे एकूण माणगांव नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी चार अर्ज दाखल झाले आहेत. दि.४ फेब्रुवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. तर दि. ९ फेब्रुवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन अधिकारी, शिवसेना नेते ऍड. महेंद्र मानकर, डॉ. संतोष कामेरकर, काशिराम पोवार, अंजली पोवार, नितीन बामुगडे, पत्रकार अरुण पोवार, रणधीर कनोजे, विरेश येरूणकर, सुनिल धुमाळ, बबन गायकवाड, उर्मिला साबळे, सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. खांदाड गावातील ज्ञानदेव पोवार यांचे समर्थक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

0 टिप्पण्या