....अन लोकांची पावले आपसूकच वालचंदनगर पोलीस स्टेशनकडे वळू लागली. (पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २८० बाटल्या रक्त संकलित)

 

भिगवण दि: १४ ( प्रतिनिधी) :

एरवी पोलीस स्टेशन म्हटलं की....काळजीने पडलेले चेहरे...दयनीय अवस्थेत पोलीस स्टेशनच्या परिसरात बसलेली  माणसं... पोलिसांनी एखाद्या आरोपीला दिलेली अचानक कानावर पडणारी जोरदार शिवी... त्याचवेळी अचानक आरडाओरडा करीत रक्तबंबाळ झालेला फिर्यादी अचानक प्रवेश करतो....एकंदरीत असेच वातावरण पोलीस स्टेशनच्या परिसरात दिसते. 


 आज ( दि.१४) मात्र कधीही पोलीस स्टेशन कडे न फिरकणारी माणसे आवर्जून पोलीस स्टेशन कडे येताना दिसत होती....बाजूला रस्त्यावर सर्वत्र मोटरसायकली उभ्या होत्या....एरवी दरडावून बोलणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी... आपुलकीने लोकांशी संवाद साधत होते... निमित्त होतं... पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे.... एक थेंब देशासाठी... एक थेंब महाराष्ट्रासाठी ही टॅगलाईन

 घेऊन आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात ठेवून वालचंदनगर पोलिस स्टेशन व श्री शिवशंभू चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास रस्ता सुरक्षेसाठी हेल्मेट आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव करण्यात येत होता.या रक्तदान शिबिरासाठी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर,सहायक पोलीस निरीक्षक बी. एन लातुरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे,पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे ,सहायक पोलीस उपनिरीक्षक रतीलाल चौधर, विनोद पवार, पोलीस अधिकारी व अंमलदार आवर्जून उपस्थित होते.



 या शिबिरामध्ये शिवशंभु चॅरिटेबल  ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या  शिबिरास प्रारंभ केला. या शिबिरामध्ये एकूण २८० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.यावेळी  सपोनि बी. एन लातुरे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले योगदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या