लोणावळा शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन


लोणावळा : येणारा गणेशोत्सव लोणावळा शहरात पर्यावरणपूरक साजरा करण्यात यावा असे आवाहन लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरवासीयांना करण्यात आले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जावा, याची माहिती देण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आज आँनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

    गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाच्या संक्रमणाचा धोका ध्यानात घेता महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या आदेशाचे पालन केले जावे. तसेच शक्यतो मातीची अथवा कागदी मुर्ती तयार करावी. थर्मोकाॅलचा वापर करू नये, फार विद्युत रोषणाई व झगमगाट करू नये, निर्माल्य ही निर्माल्य कलशात टाकावी, नदी किंवा ओढ्या नाल्यांमध्ये ती टाकू नयेत, आरती करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. गणेश विसर्जन लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विसर्जन हौदात करावे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी 4 फुट व घरगुती गणेशोत्सवासाठी 2 फुट उंचीची मर्यादा पाळावी असे आवाहन करण्यात आले आहे.

   तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना उत्सव काळात मंडळांनी वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, रक्तदान शिबिर आदी उपक्रमांचे आयोजन करावे असे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बारावकर म्हणाले, मंडळांनी मंडप घालताना वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्घतीने व लहान आकाराचे घालावेत. आगमन व विसर्जन मिरवणूकीला बंदी असल्याने डीजे व डाॅल्बी यांचा वापर करू नये तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगितले.

    14 आँगस्ट रोजी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांसाठी इक्रो फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची आँनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे अक्षय पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या