पोलीस प्रवाह न्यूज
रायगड /रत्नागिरी : दि. २३ - गेली पाच सहा दिवस रायगड जिल्ह्यात धुवांधार वादळी पाऊस पडत असल्याने नागरिकांच्या मालमतेची व शेतकऱ्यांच्या शेतीचे जबरदस्त हानी झाली आहे. महाड, पोलादपूर येथे अनेक दरडी कोसळून जीवित हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेथे युद्धपातळीवर शोध कार्य सुरू आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याने आजूबाजूच्या गावात व शहरात पाणी शिरले आहे. सध्या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मुरुड, नागोठणे, जांभूळपाडा, खोपोली, कर्जत या शहरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. गतवर्षीचे कोरोनाचे संकट अजूनही सुरू आहे. त्याला आळा बसण्याआधीच निसर्ग वादळाचे महासंकट आले. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यापूर्वीच रायगड जिल्ह्यातील नागरिकांवर तुफानी पावसामुळे आलेल्या पुरामुळे नागरिक अक्षरशः उघड्यावर पडले आहेत.
तुफानी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तसेच चिपळूण या तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. या शहरातील बाजारपेठेत व अनेक गावांत पुराचे पाणी जवळजवळ दोन दिवस होते. या पुराने हजारो दुकाने व घरे पाण्याखाली बुडाली होती. त्यामुळे वीज पुरवठाही बंद झाला होता. वीज नसल्याने मोबाईल व दूरध्वनी सेवा बंद झाली होती. त्यामुळे नातेवाईकांचा व गावांचा दोन दिवस संपर्क तुटला होता. बरेच जण अक्षरशः अन्न पाण्यावाचून राहावे लागले होते. हे पुराचे पाणी १० ते १५ फूट असल्याने सर्व अन्नधान्य पुरात वाहून गेले. एवढी पाण्याची उंची दोन दिवस असल्याने या पुरग्रस्त नागरीकांना छतावरील पाणी पिऊन दिवस काढावे लागले. कारण पूरग्रस्त नागरिकांजवळ येण्या जाण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. 

या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, आ. रविंद्र पाटील, आ. प्रशांत ठाकूर यांनी विशेष मेहनत घेऊन रातोरात एक केंद्रीय बचावकार्य दल, २ हेलिकॉप्टर तसेच श्रीवर्धन व मुरुड येथून रेस्क्यू बोटी मागविण्यात आल्या. परंतू, रात्रीही धो-धो पाऊस ढगफुटी सारखा पडत असल्याने आणि रात्री काहीच काळोखात दिसत नसल्याने या पुरात अडकलेल्या नागरिकांना सोडविण्यात अडचणी निर्माण होत होत्या. मध्यरात्री पासून पावसाचा जोर कमी झाल्याने हळूहळू पाण्याची उंची कमी होऊन ते पाणी ओसरू लागले होते. त्यानंतर सकाळी पहाटे ६ वा. पासून बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू झाले. सकाळी ७ वा. तटकरे कुटुंबीय महाड पोलादपूरमध्ये दाखल झाल्याने बचावकार्यला अधिक वेग आला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यास सुरुवात झाली. पूरग्रस्त शहरातील पाणी ओसरू लागल्याने टांगणीला असलेल्या जीवात जीव आला.
रायगड जिल्ह्यातील सावित्री, काळ, कुंडलिका, गोद व अन्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे वेगाने पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यात महाड, पोलादपूर, चिपळूण या तालुक्यातील बाजारपेठा अक्षरशः उध्वस्त झाल्या. अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली तर लाखो वाहने पुराच्या पाण्यात बुडाली होती. तसेच शेतकऱ्यांची शेती दोन दिवस पाण्याखाली बुडून गेल्याने शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. पूरग्रस्ताचे अन्नधान्य, फर्निचर, विद्युत उपकरणे, कपडालत्ता इतर सर्व काही पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मध्यरात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बचवकार्याचे आदेश तातडीने दिल्याने आणि सरकार यंत्रणा तातडीने दिल्याने पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला.
जोरदार आलेल्या पावसाळामुळे माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागा जवळील पुराच्या पाण्याच्या ओंढामुळे कुंडलिका नदीवरील पाटणुस गावाजवळील पूल कोसळल्याने काही गावांचा संपर्क तुटला. आता पूरग्रस्त नागरिक सरकार कडून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी करीत आहेत.





0 टिप्पण्या