माणगांवकरांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत झालेल्या आढावा बैठकीत खासदारांनी संबंधितांना धरले धारेवर.


अन्यथा माणगांवातून रेल्वे जाऊ दिली जाणार नाही खासदारांनी दिला इशारा.

पोलीस प्रवाह न्युज 

रायगड: दि.१- रायगड जिल्हा तसेच मुंबई-गोव्याच्या  मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव शहरातून कोकण रेल्वे दुपदरीकरण, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. हे काम जवळजवळ अंतिम टप्प्यातच आले आहे. ही कामे होत असताना माणगांवकरांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी, दि. १ मार्च रोजी माणगांव तहसील कार्यालय येथे रायगड लोकसभा खासदार सुनिल तटकरे यांनी आढावा बैठक घेतली.  या बैठकीत ज्या समस्या माणगावकरांना भेडसावत आहे त्याचे निवारण करून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी कोकण रेल्वे, एम. एस. आर. डी. सी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना दिले.                         

माणगांव शहरात कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या उंच भरावांमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. या आधी दोन वेळा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना  सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी त्यावर योग्य ती कारवाई अद्यापर्यंत केलेली नाही हे प्रत्यक्षात  कचेरी रोड येथे स्वतः जाऊन खासदारांनी पाहणी केले असता निदर्शनात आले. त्यावर कोकण रेल्वे चेअरमन यांना संपर्क केला असता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ते काम करा अन्यथा माणगांव शहरातून रेल्वे जाऊ दिली जाणार नाही, असे सक्त आदेश खासदार सुनिल तटकरे यांनी दिले. तसेच मोर्बा रोडवर गेली अनेक वर्षे गटाराचा प्रश्न प्रलंबित आहे. तेथेही प्रत्यक्षात खा. तटकरे यांनी भेट देऊन गटाराचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व उपजिल्हा रुग्णालयासमोरील विद्युतीकरणाचे काम म्हणजे विद्युतखांब हलविणे लवकरात लवकर करावे असे आदेश विद्युत महामंडळ अधीक्षक अभियंता यांना दिले. 

निजामपूर रोडवरील रेल्वे ब्रिज जवळ एम. एस. आर. डी. सी. ने केलेल्या कामामुळे नैसर्गिक होणाऱ्या पाण्याचा निचऱ्याला अडथळा निर्माण झालेला आहे. तिथे येत्या ४ दिवसात महामार्ग अधिकाऱ्यांनी पाहणी करून स्लॅब ड्रेनचे तसेच आवश्यक ते काम करावे असे ही आदेश देण्यात आले. मुंबई-गोवा, दिघी-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना ज्या चुका झालेल्या आहेत त्या सुधाराव्या व काम जलदगतीने पूर्ण करावे. तसेच अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे माणगांव येथे बंद करण्यात आले आहेत. याबाबत रेल्वे पूर्णतः मार्गावर सुरू झाल्यानंतर माणगांव येथे सर्व गाड्याचे थांबे देण्यात यावेत व माणगांव येथे मोठे जंक्शन करण्यात यावे, यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचीही लवकरात लवकर भेट घेणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले. 

माणगांवकरांना जो मनस्ताप सहन करावा लागला तो यापुढे करावा लागणार नाही त्यासाठी आवश्यक ती कामे लवकरात लवकर पूर्ण करून शहराला प्रगतीपथावर नेण्याचे काम माझ्या तसेच, पालकमंत्री आदिती तटकरे व आ अनिकेत तटकरे यांच्या पुढाकाराने करण्यात येईल. असेही आश्वासन यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी दिले. यावेळी खा. सुनिल तटकरे यांच्यासह माणगांव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, रा. काँ. तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, नगराध्यक्षा योगीता चव्हाण, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रत्नाकर उभारे, संदिप खरंगटे नितीन वाढवळ आदी सर्वच नगरसेवक तसेच कोकणरेल्वे, एम. एस. आर. डी. सी., एम. एस. ई. बी. अधिकारी व नागरिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या