रुग्णांची हेळसांड न थांबल्यास कठोर पाऊले उचलणार- वैभव साबळे
पोलीस प्रवाह न्यूज़रुग्णांची हेळसांड न थांबल्यास कठोर पाऊले उचलणार- वैभव साबळे
रायगड : दि. २९ - जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव नगरीत उपजिल्हा रुग्णालय आहे. ह्या रुग्णालयात माणगांव तालुक्यासह महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन ह्या तालुक्यातील नागरिक उपचारासाठी येत असतात. मात्र उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड मोठ्या प्रमाणात होत आहे. दि. २८ जानेवारी रोजी प्रसुती साठी आलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियात्मक प्रसूती(सीझर) येथे होणार नाही. अलीबाग ला जा नाही तर प्रायव्हेटला जा असे सांगण्यात आले. ही हेळसांड नाही थांबली तर कठोर पाऊले उचलणार असल्याचे समाजसेवक वैभव साबळे यांनी सांगितले आहे.
गेली अनेक वर्षे अपघात असो वा प्रसूती रुग्ण या रुग्णांना पुढील उपचार घेण्यासाठी अलिबाग किंवा मुंबई येथे जाण्यास सांगण्यात येते. माणगाव पासून अलिबाग ९० किमी असल्याने ३ तास तर मुंबई जाण्यास जवळपास ५ तास वेळ लागतो. या दरम्यान अपघाताचे कित्येक रुग्ण दगावले जातात. याकडे संबंधित आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. या रुग्णालयातील काही डॉ. चे एन. आर. एच. एम. मधील मागिल मानधन देखील देण्यात आलेले नाही. ते देण्यात येऊन त्यांना प्राधान्य देण्यात यावे. जेणे करुन स्थानिक डॉक्टरांची मदत देखील होईल. मात्र आज कित्येक वर्षे ही परिस्थिती अशीच असून याकडे लोकप्रतिनिधी सुद्धा कानाडोळा करित आहेत.
माणगांव शहराचा विस्तार मोठा असून आजूबाजूच्या खेडे गाव व आजूबाजूच्या तालुक्यातून येणाऱ्या रूग्णांची संख्या दररोज १५० ते २०० असते. हे रुग्णालय १०० खाटांचे असून माणगांव किंवा इतर तालुक्यातून आलेला अपघाताचा रुग्ण देखील या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून ह पुढील उपचारासाठी मुंबई किंवा अलिबाग येथे नेण्यास सांगण्यात येते. मात्र १०० बेडचे रुग्णालय असून सुद्धा त्याचा उपयोग रुग्णांना होत नाही. याचे कारण काय? असा सवाल जनतेतून होत आहे.
तसेच या रुग्णालयात आहार स्वच्छता, धुलाई, रुग्णवाहिका या सर्व सेवा कित्येक वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंत्राटदार वेगळा असून या रुग्णालयात सेवा देणारे कंत्राटदार वेगळा आहे. या रुग्णालयात अल्पशा वेतनात काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांना देखील काही महिन्यांपूर्वी काढण्यात आले असून तालुक्याचे बाहेरचे कर्मचारी आणले आहेत. १२-१५ वर्ष काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना काढून रुग्णासोबत येथील स्थानिक कंत्राटी कामगारांची सुद्धा पिळवणूक केली जाते. मात्र याकडे लोकप्रतिनिधी व पालकमंत्री दुर्लक्ष करीत आहेत. तरी या प्रकरणा कडे पालकमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.
याबाबत प्रभारी वैदयकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले व वैदयकीय अधिकारी डॉ. देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियात्मक प्रसूती(सीझर) होत नाहीत. २ स्त्री रोग तज्ञ असून डॉ. देसाई हे आजारी असल्याने व डॉ. घोंगडे हे मला एकट्याने एवढं काम होणार नाही अजून या उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ माझ्या सोबत हवे असल्याचे सांगत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांशी माझा काही संबंध नाही. संबंधित कंत्राटदार ते बघतो असे डॉ. इंगोले यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे सध्या ६ मेडीकल ऑफिसर असून त्यातील ३ जणांना डेपुटेशन देण्यात आले असल्याने इतर डॉक्टरांवरती कामाचा ताण पडत आहे. तसेच असणारी सी. टी. स्कॅन मशीन बाबत विचारले असता डॉ. इंगोले यांनी सांगितले की, इंजिनियरनी तपासणी करून सदर मशीन ही पूर्ण बाद आहे. असे सांगितलेले आहे. मात्र ही मशीन उपजिल्हा रुग्णालयात माणगांवकरांच्या समजुतीसाठी बसवलेली आहे का असा सवाल वैभव साबळे यांनी उपस्थित केला आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील काम हे नेहमी चालढकल करणारे झालेले आहे. आज हे स्त्री रोग तज्ञ डॉ.घोंगडे जर रुग्णालयात शस्त्रक्रियात्मक प्रसूती(सीझर) करण्यास अक्षम्य असतील तर तात्काळ त्यांची बदली करण्यात यावी. या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय व हेळसांड होत आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेर जाऊन उपचार करावे लागत असल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर आरोग्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून कठोर पाऊले उचलणार असल्याचे समाजसेवक वैभव साबळे यांनी सांगितले आहे.



0 टिप्पण्या