पिंपरी (प्रतिनिधी) :
अमली पदार्थ, गांजा तसेच बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून कारवाई केली. आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्याकडून पाच लाख 33 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज,शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंबिका मारुती गरुड (वय 55, रा. आळंदी, ता. खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी आळंदी परिसरात गस्त घालत असताना एक महिला अवैध गांजा व दारूची विक्री करत आल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून व दोन वेगवेगळ्या टीम तयार करून आळंदीतील घुंडरे आळी येथे सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले.
तिच्या जवळून चार लाख तीन हजार किमतीचा पंचवीस किलो 440 ग्रॅम वजनाचा गांजा, एक लाख बारा हजार नऊशे रुपये रोख रक्कम व साडे तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाने शहरातील अवैद्य धंद्यांवर करडी नजर ठेवली आहे.आयुक्तांच्या आदेशानुसार विविध ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे.यामुळे शहरात अवैद्य धंदे करणाऱ्या व त्यांना खतपाणी देणाऱ्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.


0 टिप्पण्या