*कोल्हापूर-बाचणी गावातील मैदानावर अतिक्रमण हटवण्याची युवक व खेळाडूंकडून मागणी..*
*वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा...*
दुधगंगा नदीच्या काठावर वसलेले, सर्वच क्षेत्रात नाव लौकिक मिळवत असलेले आणि पंचक्रोशीतील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले कागल तालुक्यातील बाचणी गाव..
राजकीय, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खेळात सुद्धा बाचणी गावाने आपले अस्तित्व सिद्ध करून दाखवले आहे. खेळाच्या प्रचंड आवडीमुळे आणि यशामुळे अनेक युवक भारतीय सैन्यात, पोलिस खात्यात भरती झाले. अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले. गावातील खेळाडूंनी क्रिडा क्षेत्रात बाचणी गावचा वेगळा ठसा उमटवला. या सर्वात महत्वाचे योगदान दिले ते बाचणी गावातील *प्रशस्त मैदानाने.*
बाचणी पंचक्रोशीतील सर्वात मोठे मैदान हे बाचणी गावातील विद्यामंदिर शाळेच्या पाठीमागे आहे. याच मैदानावर विविध स्पर्धा, क्रीडा महोत्सव आयोजित केले जातात. पण आता याच मैदानावर आजू बाजूच्या लोकांकडून अतिक्रमण केले जात आहे. मैदानावर सांडपाणी सोडणे, शेनी लावणे, जनावरे बांधणे, शेणखत साठवणे, पिंजराच्या होळी घालणे असे प्रकार चालू आहेत. या सर्वांमुळे खेळासाठी जागा तर कमी पडतेच शिवाय दुर्गंधी सुद्धा पसरत आहे. याचा त्रास बाचणी गावातील खेळाडूंना तसेच सैन्य भरती साठी सराव करणाऱ्या तरुणांना होत आहे.
बाचणी गावातील या मैदानावर दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण हटवून ते संपूर्ण रिकामे करून स्वच्छ बनवून देण्याचे आवाहन गावातील संवेदनशील तरुणांनी आणि खेळाडूंनी आज ग्रामपंचायत प्रशासनाला केले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर शेनी आणि पिंजराची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरीत मैदानाची पाहणी केली आणि २ दिवसांत मैदान रिकामे करून देण्याची ग्वाही दिली आहे.
यावेळी निवेदन स्वीकारताना बाचणी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते...


0 टिप्पण्या