पोलीस प्रवाह न्यूज़
रायगड : दि. २ - रायगड जिल्ह्यात चार नगर पंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या आरक्षणात ५०% पेक्षा जास्त महिलांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सर्वच नगर पंचायतीमध्ये महिलराज येणार आहे. माणगांवमध्ये प्रभाग रचना व महिला आरक्षण आल्याने सत्ताधारी व विरोधकांमधील अनेक दिगजांचे राजकीयदृष्ट्या पत्ते कट झाले आहेत. या न. पं. मध्ये १७ पैकी ९ महिला तर ८ पुरुष अशी आरक्षण सोडत निघाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माणगांव न. पं. मध्ये महिलाराज येणार आहे. असे आरक्षण झाल्याने सर्वच पक्षांची उमेदवार शोधण्याची शोधाशोध व धावपळ सुरू झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात सर्व पक्षांची आघाडी होण्याची दाट शक्यता असल्याने अटीतटीच्या लढत होण्याची शक्यता दिसून येत आहे.
२०१५ मध्ये झालेल्या माणगांव नगर पंचायत निवडणूकित राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, भाजप, शेकाप अशी लढत झाली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर अडीच वर्षानंतर नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन या नगर पंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकवून राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला होता. मात्र सहा महिन्यात शिवसेनेच्या नगराध्यक्षा व ४ नगरसेवकांना राष्ट्रवादीने थेट आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. त्यामुळे पुन्हा २०२० पर्यंत राष्ट्रवादीची सत्ता टिकून राहिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसाचा घोडेबाजार झाल्याची चर्चा नाक्यानाक्यांवर होती. त्यामुळे निष्ठावंत व विश्वासू उमेदवार मिळण्यासाठी राजकीय नेत्यांना कठीण जात आहे. नगरसेवक विकले जातात त्यामुळे सर्व पक्षीय नेते या निवडणुकीत उमेदवार निवडताना ताक ही फुंकून पिणार आहेत असे समजते.
आता काळ नदी पुलाखालून पाणी वाहून गेलेले आहे. जे पक्ष एकत्र लढत नव्हते. ते सर्व पक्ष राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात आघाडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रवादी विरोधात शिवसेना, काँग्रेस, भाजप, शेकाप, मनसे आदी सर्व पक्ष आघाडी करण्याचे संकेत मिळत आहेत. मागच्या निवडणूकित हे सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. त्याचा राजकीय फायदा राष्ट्रवादीला झाला होता. ही आघाडी झाल्यास ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या सतेच्या काळात अनेक घोटाळे, भ्रष्टाचार, गैर व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे यांची करण्यात येणारी पाठराखण, दैनंदिन स्वच्छता, पाणी पुरवठा समस्या, डम्पिंग ग्राउंडची अवस्था, अर्धवट राहिलेली विकासकामे, गटारे स्वच्छता आदी अनेक समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. अशा तक्रारी विरोधकांतर्फे करण्यात येत आहेत.
माणगांव शहरात जी काही विकासकामे झाली आहेत. ती राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात आली आहेत तर काही सुरू आहेत. इतर कोणत्याही पक्षाने एकही विकासकाम माणगांव शहरात केलेले नाही असा दावा राष्ट्रवादी पक्षातर्फे करण्यात येत आहे. माणगांवात जी काही विकासकामे झाली आहेत ती शिवसेना,भाजप युतीचे सरकार असताना त्या मंत्र्यांनी मंजूर केलेली आहेत. तसेच केंद्रामध्ये भाजपची सत्ता असल्याने भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहेत असा पलटवार शिवसेना भाजपनी केला आहे. येत्या काही दिवसात सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या तोफ डागण्यात येणार असल्याने निवडणुकीत राजकिय वातावरण चांगलेच तापणार आहे. महाआघाडी झाल्यास सत्तांतर अटळ आहे असे दिसून येत आहे.





0 टिप्पण्या