रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी
माणगाव: दि ५- माणगांव नगरपंचायत निवडणूकीची चाहूल लागत आहे. त्यामुळे साहजिकच आता हौशे, नवशे, गौशे सरसावले आहेत. कारण जगात काय बी होऊ द्यात पण आमची राजकारणी डोकी कधीच थांबणार नाही. म्हणुन तर म्हणतात ना कोरोना आला सगळ्यांना सुधारायला पण राजकारण्यांना मात्र सुधारु शकला नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, कोणी किती विकास केला याचीच चर्चा आता रंगु लागली आहे. जनता चारही बाजूने हैराण आहे. कोरोना संकट व चक्रीवादळ आपत्ती समयी नगरसेवकांच्या सामाजिक मदत कार्याची जोरदार चर्चा व झालेल्या विकास कामांवर जनते मधून सवाल उपस्थित केले जात आहेत.
लोकांना वेळेवर पिण्याचे पाणी, दैनंदीन स्वच्छता, खड्डे विरहीत रस्ते, दिवाबत्ती, सांडपाणी निचरा व्यवस्था या महत्वाच्या गरजा वाटतात, परंतु झालेल्या विकास कामांची सध्या अवस्था काय ? विकास कामा नंतरची देखभाल दूरुस्ती दुर्लक्षित होते. शासनाचा निधी वाया जातो, याचे मुल्यांकन कोण करतय ? नदीचे प्रदूषण, सार्वजनिक बसस्थानकातील रस्त्यांवरील खड्डे, नविन शासकिय इमारती मधिल तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहांच्या होणाऱ्या दूरावस्थेला कोण जबाबदार ? फार मोठा निधी नगरपंचायतीने स्वच्छता मोहीमेवर खर्च केला आहे. परंतु अजूनही कचरा डंपिंग प्रश्नांकित आहे.
अजूनही काही लोक घंटागाडीची वाट न बघताच कचरा रस्त्यावर टाकतात. म्हणजेच आपण जनजागृती, अंमल बजावणी करण्यात कमी पडत आहोत का ? लोकांना शिस्त लावण्यात नगरपंचायतचे प्रयत्न कमी पडत आहेत. नगरसेवक शिस्त लावण्यासाठी आग्रही नाहीत कारण मतांचे राजकारण आड येते, अस बोललं जात आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काय ? विकास केवळ टेंडर आणि स्वार्थ, फायदा तोटा या पूर्ताच मर्यादित झाला आहे का ? असा सवाल जनते मधून उपस्थित केला जात आहे. कदाचित यामुळेच ही परिस्थिती असल्याची चर्चा देखिल लोक करतात.
या सर्वांचा लेखाजोखा यावेळी निवडणूकीत होणार, कोरोना संकटात कोण किती मदतीला आले ? मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, त्यांना जनता जाब हा विचारणारच ! नगरसेवक हा तत्परतेने वार्डातील समस्या सोडविणारा हवा अस लोक बोलत आहेत. अशी एकंदरीत माणगांवची हवा आहे. त्यामुळे विरोधक खुशीत दिसतात मात्र माणगांव मध्ये कोरोना संकट समयी विरोध थंडावल्याने ही निवडणुक व्यक्तीगत पातळीवर होणार असल्याची चर्चा आहे. अशातच राज्यात तिन चाकी सरकार ही तिन्ही चाकं या स्थानिक निवडणुकीत एकामेका सोबत कि एकामेकाचे वर्चस्वासाठी लढतील हे येणारा काळच ठरवेल.
सध्या नगरपंचायत सत्ताधारी राष्ट्रवादीची अर्थात माणगांव मध्ये माजी मंत्री तथा विद्यमान खासदार सुनिल तटकरेंच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली. कोट्यावधीची पाणी पूरवठा योजना, नविन मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय, पंचायत समिती इमारत, नाट्यगृह, नाना नानी पार्क, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, कालवा रस्ता रुंदीकरण, नदीवरील घाट, स्मशान भूमी व त्यावरील शेडचे बांधकाम, समाज मंदिरे, क्रीडा संकुल अनेक छोटी मोठी कामे कुणीही नाकारु शकत नाही. व आता पालकमंत्री ना. आदितीताई तटकरेंच्या माध्यमातून विकास होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरणार हा सध्या चर्चेचा विषय आहे.



0 टिप्पण्या