वैभव सत्वे , प्रतिनिधी
रायगड : दि ४ - २०८ लिटर ऑक्सिजनची क्षमता असणारी अद्ययावत आधुनिक मिनी बल्क कंटेनर सिस्टीम पफ इन्सूलेटेड माॅडिफाईड (mini bulk container system puf insulated modified ) यंत्रणेचे उद्घाटन शासकीय अनुदानातून माणगाव येथील उप जिल्हा रुग्णालयात शनिवार,दि.3 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुहास माने, माणगाव कोविड उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम जीव्हीएस एअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड,बारामती ( GVS Air services pvt ltd. Baramati ) या शासन नियुक्त कंपनीमार्फत करण्यात आले आहे.
या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा योगिता चव्हाण, माजी नगराध्यक्ष आनंदशेट यादव, सुभाष केकाने, नगरसेवक संदीप खरंगटे, जयंत बोडेरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, वैद्यकीय अधिकारी डॅा.तुषार शेट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले आदि मान्यवर उपस्थित होते.
शासनाकडून ड्युरा सिलिंडर टँक बसविण्यात आल्याने ऑक्सिजनची उत्तम सुविधा उपलब्ध झाली असून यामुळे ऑक्सिजन रिफीलिंगची क्षमताही वाढली आहे. या यंत्रणेमुळे यापुढे ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहणार आहे. तसेच त्यावर योग्य नियंत्रणही ठेवता येणार आहे.
मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाप्रमाणेच अधिक क्षमतेच्या क्रायोटँकची मागणी आपल्या इथे शासनाकडून उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती माणगाव कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डाॅ. प्रदीप इंगोले यांनी यावेळी दिली.




0 टिप्पण्या