माणगाव मोर्बा मार्गावरील गोद नदी पूल धोकादायक ; पुलावर मोठमोठे खड्डे; भगदाड पडण्याची शक्यता.

 
अरुण पवार , प्रतिनिधी

रायगड : दि . ७ : माणगांव शहराच्या हद्दीतील १ किमी अंतरावरील मोर्बा मार्गावरील नव्यानेच बांधण्यात आलेला पूल धोकादायक बनला आहे. त्याच्या माध्यभागी मोठमोठे खड्डे पडून खडी व सळया बाहेर निघाल्या आहेत. हा पूल २ वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेला असून या मार्गाचे दुहेरीकरण झाले आहे. या पुलावरून सतत रहदारी आणि दिघी बंदरातून अवजड वाहने ये-जा करीत असतात. या पुलाचे काम अर्धवट स्वरूपात बाकी राहिले आहे. या पुलावर खड्डे भरून व डागडुजी करावी अशी मागणी होत आहे. 

माणगांव- मोर्बा या पुलावरून रोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. माणगांव ते दिघी या मार्गाचे गेल्या २ वर्षांपासून रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत केले जात असून या मार्गासाठी २४० कोटी रु. प्रशासकीय अंदाजित खर्च आहे. या मार्गाचे रूपांतर महामार्गात होणार आहे. मात्र माणगांव ते दिघी या ७० किमी अंतरामध्ये सर्वच ठिकाणी अर्धवट बांधकाम झालेले असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते. ठिकठिकाणी खड्डे व मातीचा खच असल्याने नेहमीच अपघात होत असतात. जोरदार पाऊस पडल्याने आता खड्यांमध्ये वाढ होत आहे. 

माणगांव हद्दीतील गोद नदीवरील पुलाची रुंदी वाढविण्यात आली आहे. मात्र जुना पूल तसाच ठेऊन या पुलाच्या दोन्ही बाजूस नव्याने पिलर आणि सिमेंट स्लॅब टाकण्यात आला आहे. परंतु, जुना पूल मध्यभागी तसाच ठेवण्यात आल्याने जुन्या पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळया ठिकठिकाणी बाहेर आलेल्या आहेत. त्यावरूनच दिघी बंदरातील अवजड वाहने ये- जा करीत असल्याने हा पूल अत्यंत कमकुवत व धोकादायक बनला आहे. तसेच पुलावर आवश्यक ते बांधकाम आणि स्लॅब न टाकल्याने ठिकठिकाणी खड्डे पडून सळया बाहेर आलेल्या आहेत. 

हा पुल सुमारे १९९० साली बांधण्यात आलेला असून त्याला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पुलावरून सातत्याने पर्यटक, प्रवाशी आणि अवजड वाहने जात असल्याने या पुलाचे बांधकाम कमकुवत झाले आहे. याची तातडीने डागडुगी न केल्यास किंवा नव्याने न बांधल्यास महाड येथील सावित्री नदीच्या पुलाची पुनरावृत्ती दुर्दैवाने होऊ शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. हे काम २ वर्षात पूर्ण करावयाचे होते. परंतु, हा मार्ग अर्धवट अवस्थेत राहिलेला असून त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या महामार्गाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. पूल, मोऱ्या, गटारे, तीव्र चढ उतार, वळणे ही सर्व कामेही अर्धवट राहिल्याने अपघातांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक व सावधगिरीचे फलक नसल्याने या खड्डयातून सर्व वाहने जोरजोरात आदळत असतात. त्यामुळे गाड्या घसरून अपघात होत आहेत. खाजगी वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने त्यांची वाहने या खड्यांमुळे वारंवार नादुरुस्त होत आहेत. तसेच प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या