आश्रमशाळे जवळील आदिवासींची वाट बिकट रस्त्यावर अळ्या सार्वजनिक आरोग्य धोक्यात - पालकमंत्री लक्ष वेधा.


रविंद्र कुवेसकर , प्रतिनिधी

माणगांव; दि. २३ - एकीकडे कोरोना संसर्गाने संपूर्ण जग हैराण आहे. आरोग्यसेवा, प्रदूषण, पर्यावरणाकडे आपल्या शासन व्यवस्थेकडून झालेले दूर्लक्ष याबाबत खंत आता अनेक लोक प्रतिनीधी व्यक्त करतात. माणगांव शहरातील कचरा डंपींगचा प्रश्न देखिल अत्यंत महत्वाचा आहे. वनवासी आश्रमशाळेच्या जवळ उतेखोल आदिवासी वाडी असून याच ठिकाणाहून माणगांवला येण्यासाठी रस्ता आहे आणि नेमके याच रस्त्यावर कचरा बेफिकीरपणे टाकण्यात येतो अशी माहीती येथील आदिवासी नागरिकांनी दिली आहे.

आमची लहानलहान मुले याच रस्त्याने जातात सध्या शाळा बंद आहेत. पण आमचे वाडीवरुन बाजारहाट व दैनंदिन कामकाजासाठी जाणे येणे साठी हाच एकमेव रस्ता आहे. येथे अत्यंत दुर्गंधी व रस्त्यावरील कुजलेल्या कचऱ्या मुळे अळ्या, किडे, जीवजंतू पडले असून ते रस्त्यावर सहज दिसून येतात. तसेच वाडीवर एखादा आजारी पडला तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी अथवा इतर काही महत्वाचे कामासाठी भाड्याच्या रिक्षा देखील या ठिकाणी या घाणेरड्या परिस्थिती मुळे येण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे येथील आदिवासींसह स्थानिक नागरिकांचेही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

हा कचरा डंपींग करताना तो दूरवर टाकावा असे नगरपंचायतचे निर्देश होते परंतु ज्या कचरा गाड्या येथे येतात त्या ठरलेल्या ठिकाणी न टाकता रस्त्यातच कचरा टाकत असल्याची बाब येथील नागरिकांनी निदर्शनात आणून दिली आहे. फार मोठा निधी आपण स्वच्छते विषयक कारणास्तव खर्ची टाकला आहे. मग एकीकडे ही अनास्था कितपत योग्य आहे? हा सवाल ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी कचरा संरक्षक भिंती घालून या मध्येच कचरा डंप करावा कारण हा कचरा कुजून पडणाऱ्या पावसाचे पाणी येथून वाहत काळनदीलाच जाऊन मिळते. याच नदीचे पाणी पिण्यासाठी वापरात येते.

या गोष्टींकडे नगरपंचायत प्रशासन मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष, आरोग्य सभापती, नगरसेवक, स्थानिक लोक प्रतिनीधींनी लक्ष वेधावे तसेच रायगडचे पालकमंत्री यांनी या नागरिकांचे आरोग्याचे दृष्टीकोनातून माणगांवच्या कचरा डंपींग व कचराप्रक्रीया प्रकल्पा संदर्भातील गेले अनेक वर्ष चर्चेत असलेल्या प्रश्नाकडे लक्षवेधून लवकरच हा अत्यंत महत्वाचा प्रलंबित विषय मार्गी लावावा अशी माणगांवकरांची मागणी आहे.

                              पोलीस प्रवाह न्यूज




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या