ना. आदिती तटकरे अनुभवी नेत्या-सुभाष केकाणे


अरुण पवार, प्रतिनिधी

माणिक जगताप यांच्यावर खरबरीत टीका

माणगाव: दि २० - ना. आदिती तटकरे या २००७ पासून समाजकारण आणि राजकारण करीत आल्या आहेत. सुनिल तटकरे प्रतिष्ठान आणि सत्यश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थामार्फत समाजकार्य करीत आहेत. या काळात त्यांनी संपूर्ण श्रीवर्धन मतदार संघ सेवाभावी वृत्तीने काम करून गोरगरीब व सामान्य जनतेच्या समस्या सोडविल्या आहेत. २०१७ ला जिल्हा परिषदेची निवडणूक सुमारे ४५०० मतांनी आदितीताई तटकरे जिंकून त्या प्रथमच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या. १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या  कामाचा अनुभव त्या जि. प. अध्यक्ष असताना झाला. त्या काळात संपूर्ण रायगड जिल्ह्यात तळागाळात काम केले. 

जिल्हा परिषदेत उल्लेखनीय काम केल्याचा अनुभव असल्याने आदिती तटकरे या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून तब्बल ४० हजार मतांनी निवडून आल्या. त्यांच्या कामाचा आवाका पाहून त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात ८ राज्य मंत्रीपद बहाल करण्यात आली आहेत. मात्र माजी आमदार माणिक जगताप हे लोकांना चुकीची माहिती देऊन स्वतःचे समाधान करून घेत आहेत. त्यांची मुलगी स्नेहल जगताप या प्रथमच महाड नगरपरिषदेच्या  नगराध्यक्षच्या पदासाठी निवडणूक लढवित होत्या. तेव्हा आदिती तटकरे या स्नेहल जगताप यांचा प्रचार करीत होत्या. त्यानंतर स्नेहल जगताप या नगराध्यक्षा पदी निवडूनही आल्या. त्यावेळी जेष्ठ नेत्या म्हणून आदितीताई तटकरे यांच्याकडून स्नेहल जगताप यांनी पहिले भाषण  लिहून घेतले होते. यांची आठवण करून दिली. त्यामुळे अनुभवी कोण? हे जनतेला माहिती आहे. असा मार्णिक टोला माणगांव तालुका राष्ट्रवादी कोंग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे यांनी माणिक जगताप यांना लगावला. 

      माजी आमदार माणिक जगताप यांनी नुकतीच खासदार, पालकमंत्री आमदार यांच्यावर खरमरीत टीका केली होती. त्यावर सुभाष केकाणे यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, माणिक जगताप हे तीन वेळा चढत्या मताधिक्याने पराभूत  झाले आहेत. त्यांनी सकाळी लवकर उठून जनसंपर्क वाढवून लोकांची कामे केली तर ते निश्चितपणे निवडून येतील. मात्र निवडून येण्याची वर्ष किती लागतील हे सांगता येणे कठीण आहे. तटकरे परिवार रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी ६ वा. पासून लोकांच्या सेवेत असतात. विकासकामे करताना जात, धर्म, पक्ष न पाळता सर्वांचीच कामे करीत असतात. जगताप हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले आणि ३० हजार मतांनी पराभूत झाले. तर आदितीताई तटकरे या प्रथमच निवडणुकीला सामोरे जाताना सुनील तटकरे यांच्यापेक्षा दुप्पट मतांनी निवडून आल्या. तसेच खा. तटकरे यांनी संभाळलेल्या मंत्री मंडळातील खात्यांपेक्षा जास्त विविध खाती त्या समर्थपणे सांभाळत आहेत. एवढा मोठा विश्वास त्यांच्यावर महाविकास आघाडीच्या सरकारने टाकला आहे. याचे आत्मचिंतन माणिक जगताप यांनी करावे. असा सल्ला सुभाष केकाणे यांनी दिला. 

     "मूर्ख बैसला किर्तनी, ना कळे अर्थाची करणी" या उक्तीनुसार माणिक जगताप हे राजकारणात वावरत आहेत. तसेच आघाडीचा धर्म न पाळता खा. सुनील तटकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यावर टीका करून बेताल वागत आहेत. देशात व राज्यात कोरोनाचे महासंकट असताना जगताप हे भरकटत चालले आहेत. दुपारी १२ वा. उठून पत्रकार परिषदेतून टीका करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला तर भविष्य काळात कधीतरी निवडून येऊ शकतात. त्यांनी आपल्या वागण्यात सुधारणा न केल्यास पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. अशी टीका सुभाष केकाणे यांनी केली.

पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या