माणगांव तालुक्यात कोरोनाचं सावट ; २३ गावे ३७ वाड्यात पाण्यासाठी पायपीट.



अरुण पवार, प्रतिनीधी

माणगांव : दि.११- माणगांव तालुक्यात ग्रामस्थ आणि नागरिकांना कोरोना बरोबर भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही २३ गावे आणि ३७ वाड्यात भीषण पाणी टंचाई भासत असून खेड्यापाड्यात विशेषतः महिलांंना पायपीट करून भर रणरणत्या उन्हाळ्यात वणवण करावी लागत आहे. या दुहेरी संकटातून मार्ग काढण्यासाठी शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांना तारेची कसरत करावी लागत आहे.

        माणगांव तालुका हा डोंगराळ व दुर्गम असा तालुका आहे. या तालुक्यात ७४ ग्रामपंचायती असून सुमारे ३०० गावे आणि २०० वाडया अशी एकूण ५०० छोटीमोठी गावे आहेत. मात्र दरवर्षी लोकांना पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जीवाचे रान करावे लागते. दरवर्षी भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होऊ लागला आहे. पाणी टंचाईच्या काळात कायमस्वरूपी व ठोस उपाययोजना करीत नसल्याने ही पाणी टंचाई वर्षानुवर्षे तसाच कायमस्वरूपी प्रलंबित राहिला आहे.

          माणगांव तालुक्यातील अनेक पाणी योजना विविध कारणांमुळे बंद पडलेल्या आहेत. अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या गलथान कारभार याला कारणीभूत आहे. त्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रसंगी मरणयातना भोगायला लागत आहेत. याची दखल कोणीही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी घेत नाहीत. त्यामुळे पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतले तर ते वाहुनच जात आहे. या पाणी टंचाई ग्रस्तांना दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. या पाणी योजना बंद झाल्याने शासनाचे लाखो- करोडो रुपये पाण्यात गेले आहेत. शासन पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्यासारखा खर्च करीत असते. परंतु  अधिकारी यांच्या चुकीच्या धोरणामुळे काही ठिकाणी पाणी योजना बंद पडलेल्या आहेत.           

 शासनाच्या राष्ट्रीय, राज्य,जिल्हा, तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर विविध योजना राबविण्यात येत असतात आणि आहेत. परंतु मानसिकता, आत्मियता आणि तळमळ नसल्याने महिलांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

माणगांव तालुक्यात सुरव, आमडोशी, बामणगाव,फळसप, घोडेघुम, मालुस्ते, जोर, केळगण, कुंभार्ते, मांजरोवणे,जांभुळमाळ, बोरमाळ, उमरोली, वडाचा कोंड, कविळवहाळ, वावेदिवाळी मुठवली, उसर, देगाव,पळसगाव, कोंडेथर, हुंबरी,मशीदवाडी, कातळवाडी, उधळेकोंड, सोनारवाडी, वडाचीवाडी,खर्डी, गौळवाडी,विहूलेकोंड, सांगी,महादपोली, कुंभेवाडी,कामतवाडी,मोरेवाडी, कावडेवाडी,फणसवाडी, बागवाडी, कोस्ते, गौळवाडी,निळज, रोहिदासवाडी आदी २३ गावे आणि ३७ वाड्या अशा सुमारे ६० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. हि गावे पाणी टंचाई आराखड्यात असली तरी निकषानुसार न बसलेल्या अनेक गावांमध्ये पाण्यासाठी गावकऱ्यांना दोन करावे लागणार आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना पिण्याचे पाणी आणण्यासाठी बाहेर पडावेच लागणार आहे असे खेड्यातील महिलांनी सांगतांना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#raigad#Mangaon#Maharashtranews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या