वैभव सत्वे, प्रतिनिधी
माणगांव : दि . ८ - तळा येथिल नगरपंचायत कार्यालयात दि.७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. तसेच कोरोना विषाणूमुळे संपूर्ण तळा शहर बंद असताना शहरात साफसफाई करणे, जंतुनाशक फवारणी करणे, नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी माधुरी मडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आरोग्य दिनाला उपस्थित असलेले तळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाँ.अमोल बिरवाटकर यांनी नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचारी यांची जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी केली. व कोरोना विषाणूबद्दल माहिती देऊन त्यापासून बचाव करण्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व सफाई कामगारांना मास्क, हँड ग्लोज, सँनिटायझर यांचे वाटप करण्यात आले.
कोरोना पार्श्वभूमीवर या कर्मचाऱ्यांनी प्रशासनास उत्तम प्रकारे केलेले सहकार्य निश्चितच अभिमानास्पद, गौरवास्पद असल्याचे मत मुख्याधिकारी माधुरी मडके यांनी व्यक्त करून कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले. या प्रसंगी मुख्याधिकारी माधुरी मडके, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल बिरवाटकर, आरोग्य सचिव दीपक वडके, राजेश शिंदे यांसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते


0 टिप्पण्या