अरुण पवार, प्रतिनीधी
माणगांव :दि २१ - माणगांव तालुका हा जिल्हयाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जातो. माणगांव हे तालुक्याचे ठिकाण आहे. याच शहरातून मुंबई-गोवा महामार्ग, कोकण रेल्वे मार्ग, दिघी-माणगांव-पूणे महामार्ग, विविध राज्यमार्ग, जोड रस्ते, शैक्षणिक सुविधा तयार करण्यात आलेल्या आहेत. या सोयीसुविधा गेल्या १० वर्षांत झालेल्या आहेत. मात्र यापूर्वी माणगांव तालुका मागास तालुक्यापैकीं एक होता. त्यामुळे या तालुक्यातील ८० % तरुण मुंबई व पूणे येथे कामधंद्यानिमित्त जात असत. आजही मोठ्या प्रमाणात या शहरात दाटीवाटीने रहात आहेत. मात्र कोरोना संकट आल्यानंतर त्यांना घरवापसी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आजच्या घडीला माणगांव तालुक्यात सरकारी आकडेवारी नुसार रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यापेक्षा सर्वात जास्त म्हणजे १८,२४८ इतक्या चाकरमान्यानी घरवापसी केली आहे असे रायगड जिल्हा परीषदेने शोध मोहीम सुरु केल्यानंतर निदर्शनास आले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग ११,५६०,कर्जत ६३७ ,खालापूर १२६२ ,पेण २,६७०,पनवेल १७२,पोलादपूर ७,४२७ , महाड १२,०३३ ,म्हसळा ८,८९४ ,मुरुड ४०५८ ,सुधागड ८०२९ श्रीवर्धन ६४७४ ,रोहा ५०५६ तळा ८३२४ ,उरण ३६८ असे एकूण ९५,२११ चाकरमानी व नागरिक मुंबई, पूणे, सुरत आणि इतर परजिल्हातून आले आहेत. तसेच परदेशातून ३९३ तर परराज्यातून ७,४२३ नागरिक रायगड जिल्ह्यात वास्तव्यास येउन त्यांनी घरवापसी केली आहे. असे एकूण १ लाख ३ हजार २६ लोक रायगडमध्ये आले आहेत. या अतिरिक्त महिनाभरात आलेल्या प्रचंड लोंढ्यामुळे जिल्हा प्रशासनावर अधिकचा ताण पडत आहे.मात्र रायगड जिल्हा परीषदेने काटेकोर नियोजन केल्याने पनवेल, उरण,श्रीवर्धन, पोलदपूर हे चार तालुके वगळता इतर तालुक्यात कोरोना संशयित आढळून आलेला नाही याचे श्रेय सर्वाथाने जिल्हा परीषदेबरोबरच पोलिस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, महसूल विभाग स्थानिक स्वराज्य संस्था यांना द्यायलाच हवे.
माणगांव तालुक्यातून मुंबई व पूणे या शहरात आता जाण-येणे सहज शक्य झाले आहे.मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि माणगांव-ताम्हिणी घाट मार्ग जवळपास पूर्ण होत आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक रहदारी सुलभ झाली आहे. या शहरात २ ते ३ तासात पोहचता येते. रेल्वेने सुध्दा सहजासहजी जाता येते. या सर्व दळणवळण सुविधांमुळे कोरोना संकटातून सुटका होण्याकरिता चाकरमानी गुपचुपणे टाळेबंदी नंतर मिळेल त्या वाहनाने आपल्या गावाकडे सुखरूप आले.त्यानंतर एकाच लहानशा झोपडीत झोपडपट्टीत राहणारे आणि छोट्याशा चाळीत दाटीवाटीने कसेबसे राहणारे किमान १० ते १२ जण यांना जगणे असह्य होऊ लागले. त्यांची जीव कासावीस होऊ लागला. जीवाची घालमेल आणि गावाकडे जाण्याची आस अस्वस्थ करीत होती. त्यामुळे वाहतूक बंदी असताना गाव व कुटुंबाच्या ओढीने ते रेल्वे व महामार्गावरून दिवसरात्र न थकता मोठे पायपीट आणि यातायात सहन करून आपले गाव गाठले.गड्या आपला गाव बरा....हे मनोमनी ओळखून गावकी, भावकी आणि कुटुंबात पून्हा येऊन घरवापसी केली.
इतक्या यातना आणि यातायात करून घराकडे आल्यानंतर काहींना शाळेत किंवा गावाबाहेर ठेवण्यात आले. त्यांची आरोग्य व कोरोना तपासणी झाली. नावनोंदणी झाली. चौकशी झाली. त्यांना खबरदारी म्हणून १४ दिवस अलगीकरण केले. त्यांच्या हतावर अलगीकरण शिक्के मारण्यात आले. या सर्वांनी शासनाच्या या शोध मोहिमेस सर्वतोपरी सहकार्य केल्यानंतर माणगांव व इतर तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूला आळा बसल्याचे दिसून येत आहे हे शासकिय यंत्रणेला आलेले मोठे यश म्हणावे लागेल.
पोलीस प्रवाह न्यूज
#covid19#coronavirus#lockdown#Raigad#Mangaon#Maharashtranews


0 टिप्पण्या