पोलीस प्रवाह न्युज स्पेशल रिपोर्ट
मुंबई : दि . १४ - देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. देशातील सर्व नागरिकांना 3 मेपर्यंत नियमांचं पालन करावं लागणार आहे. या दिवसांमध्ये सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचंही मोदी म्हणाले. दरम्यान, काही राज्यांनी आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला होता. पण आता मोदींनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याची मोठी घोषणा केली आहे.
राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली.
योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळे आपली स्थिती बलाढ्य देशांच्या तुलनेत चांगली असल्याचं मोदी म्हणाले. आपली तुलना कोणत्याही देशाशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. पण जगातील बलाढ्य देशांशी तुलना करता आपण अतिशय चांगल्या स्थितीत आहोत. महिना दीड महिन्यापूर्वी बरेचसे देश आपल्या बरोबरीत होते. मात्र आत्ता तिथे कोरोनाचे रुग्ण २५ ते ३० पट आहेत. मृतांचा आकडा हजारोंच्या घरात आहे. आपण योग्य वेळी निर्णय घेतले नसते, तर आपली स्थिती काय असली असती, याची कल्पनाही करवत नाही. मागील दिवसांमधील स्थिती पाहिल्यास, आपण जे केलंय ते योग्य होतं याची खात्री पटते. लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंगचा फायदा देशाला झाला. त्याची आर्थिक किंमत आपण चुकवली. पण देशाच्या नागरिकांच्या जीवापुढे ती किंमत काहीच नाही.
पोलीस प्रवाह न्यूज
#Narendramodi#pmmodi#modispeech#lockdown #covid19


0 टिप्पण्या