१२ वर्षीय तनय लाडने गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू १७ किमी अंतर पोहून नवा विक्रम प्रस्थापित केला
पोलिस प्रवाह न्युज
महाड: - दि. ३ महाड येथील (सध्या कामोठे-पनवेलचा रहिवासी असलेल्या) तनय तुषार लाड याने केवळ १२ वर्षांचे असताना अभूतपूर्व जलतरण कामगिरी करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू (१७ किमी) हे अंतर केवळ २ तास २६ मिनिटांत पार करत सर्वांत वेगवान जलतरणपटू होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या कामगिरीत प्राक्षिशकांचा मोलाचा सहभाग लाभला आहे. तो रुपाली रेपाळे स्विमिंग अकादमी, पालावा येथे प्रसिद्ध जलतरणपटू आणि मार्गदर्शक रुपाली रेपाळे व अनिरुद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
तनयने २ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.४६ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून अरबी समुद्रात उडी घेतली आणि भरतीचे लहरी प्रवाह, वाऱ्याचा जोर आणि हवामानाच्या स्थितींशी झुंज देत हा लाटांवरचा खडतर प्रवास त्याने ११.१४ ला अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू येथे संपवुन एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. त्याच्या या अपूर्व यशामुळे तो जलतरण क्षेत्रात एक नवीन प्रेरणादायी उदाहरण बनला आहे.
तनय सध्या न्यू होरायझन पब्लिक स्कूल, पनवेल येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे, तसेच याआधी २०२४- मध्ये त्यानी थायलंडमध्ये ओशियन मॅन स्पर्धेत कांस्यपदक, संकरॉक ते गेटवे, पेरियार कोची केरळ, विजयदुर्ग, रंकाळा कोल्हापूर येथे रौप्यपदक, आणि मालवण, पोरबंदर स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या जलतरण कौशल्यांचे सुरेख प्रदर्शन केले आणि पदकाची लूट केली.
खुल्या समुद्रात स्विमिंग हे अत्यंत कठीण व धाडसी क्रीडाप्रकार आहे. समुद्राच्या अनिश्चित लाटांसोबत लढत, सतत बदलणारे हवामान आणि जलचरांचा सामना करत, हा स्पर्धक प्रत्येक क्षणी जिंकण्याच्या जिद्दीने पोहत असतो. त्यानी या सगळ्या आव्हानांना समर्थपणे तोंड दिले. त्याच्या यायशामागे त्याची वयाच्या सहाव्या वर्षांपासूनची कठोर मेहनत, मानसिक तयारी. कठोर परिश्रम, नियमित सरावासाठी रोज पनवेल ते पलावा डोंबिवली प्रवास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या यशामुळे त्याने आपले कौशल्य, मेहनत आणि चिकाटी यांचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. एक सर्वसामान्य जलतरणपट्टु चे विशेष गुण ओळखून त्यांना सर्व कसोटीत उत्तीर्ण करणे या मध्ये रूपाली रेपाळे आणि अनिरुद्ध महाडिक यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
तनयच्या या विक्रमी कामगिरीमुळे त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याच्या कुटुंबीयांबरोबरच प्रशिक्षक, मित्रमंडळी आणि संपूर्ण शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





0 टिप्पण्या