भविष्यात जिल्ह्याची राजधानी माणगांवच होईल- खा. सुनील तटकरे

 भविष्यात जिल्ह्याची राजधानी माणगांवच होईल- खा. सुनील तटकरे

पोलीस प्रवाह न्यूज

 माणगांव- दि. १८- माणगांव हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून भविष्यात रायगड जिल्ह्याचे विभाजन झाल्यास माणगांव हे रायगड जिल्ह्याची राजधानी होईल, असा आत्मविश्वास खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त करून समस्त माणगांवकरांना आश्वाशीत केले. माणगांव येथे झालेल्या प्रचार सांगता सभेत सुनील तटकरे यांनी अनेक विकास कामांचा उहापोह करून भविष्यात सर्व समस्या सोडवून विकास कामांना गती देण्यात येणार आहे असे सांगितले. मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण होईल. माणगांव, इंदापूर शहरातील बायपास मार्गाचे काम जलदगतीने होईल. रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाड्या माणगांव व रोहा येथे थांबतील.  दिघी बंदर सुरू झाल्याने माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, मुरुड या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला जाईल. तसेच कुशल कामगार तयार करण्यासाठी त्या  प्रकारचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल. माणगांव शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येईल. पर्यटनाला चालना देण्यात येईल. माणगांव शहरातून जाणाऱ्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल. 

  यावेळी  महिला राज्य आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर , शिवसेना प्रवक्ते ॲड. राजीव साबळे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक आनंद यादव, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, तालुकाप्रमुख ऍड. महेंद्र  मानकर, महिला तालुका अध्यक्षा संगीता बक्कम, शहर अध्यक्षा योगीता चव्हाण, सायली दळवी, राजेंद्र शिर्के,  उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, माणगांवकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 माणगांव शहरातील काळ नदीवरील भादाव पूल बांधण्यात येईल. मुबलक व उच्च दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी बंधारा बांधण्यात येईल. नाट्यगृहाच्या बांधकामाला अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल. येत्या वर्षात  नगर पंचायत ईमारत बांधकाम पूर्ण केले जाईल. माणगांव येथील कुणबी समाजाच्या सभागृहास आर्थिक निधी उपलब्ध केला जाईल. लवकरच  विकास आराखडा मंजूर केला जाईल. तसेच पूर नियंत्रण रेषा रद्द केली जाईल, अशी विविध आस्वासन खा. तटकरे यांनी यावेळी दिली.

 आम्ही जातीपातीचे राजकारण करीत नाही. आम्ही सर्व समाजाला बरोबर घेऊन जातो. सर्व समाजाने गेली २५ वर्ष आम्हाला निवडून दिले आहे. त्यावेळी कधी ही जातीचे राजकारण झाले नाही. केवळ सर्व समाजाने विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोट्यवधी निधी या मतदारसंघात आम्ही आणू शकलो याचा सार्थ अभिमान आहे. आदिती तटकरे यांनी कोरोना काळात अतिशय चांगले काम केले. येथील माणगांव उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजन सेंटर आणून केवळ माणगांव नव्हेच तर रायगड जिल्ह्यातील अनेकांचे जीव वाचविले आहेत. निसर्ग वादळात कौतुकास्पद कामगिरी करून मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यश मिळविले आहे. माणगांव शहरात कोट्यावधीची विकासकामे केली आहेत. लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांनी यशस्वीपणे राबविली आहे. त्यामुळे महिलांना मोठा आधार आणि दिलासा मिळाला आहे, असे खा. तटकरे यांनी सांगितले.  

     आदिती तटकरे यांच्या विरोधात जे उमेदवार राहिलेत त्यांना ग्राम पंचायतीमध्ये आमच्या शिलेदारांने पराभूत केले आहे. ते विकास कामांच्या बतवण्या मारीत आहेत. परंतु, त्यांनी स्वतःच्या ग्राम पंचायत प्रभागात विकास कामे केली नाहीत. त्यांनी विकास कामांच्या वल्गना करू नयेत. हजारो तरुणांना रोजगार आम्हीच दिला आहे. विकास कामेही आम्हीच केली आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला याबाबत शिकवू नये, असे खा. तटकरे यांनी खडसावून सांगितले.


  दिल्ली मुंबई कॉरिडॉरला उद्धव ठाकरे व सुभाष देसाई यांनी विरोध केला. त्यामुळे रोजगार निर्मिती झाली नाही. म्हणून तरुणांना रोजगार मिळाला नाही. येथील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी दिघी बंदर पंतप्रधानांन कडून मंजूर करून घेतले. त्यात रायगड जिल्ह्यातील हजारो तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्याचा रायगडकरांना मिळणार आहे. माणगांव येथे नर्सिंग कॉलेजला मंजुरी देण्यात आली आहे. खेळाडूंसाठी  कोकण विभाग क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.  ट्रॉमा केअर हॉस्पिटल उभारून उपजिल्हा रुग्णालयात सर्व सुखसोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या